जुन्नर तालुकात रब्बी हंगामात पाणी टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. अशातच कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
२० ते २५ डिसेंबरदरम्यान कुकडीतून साडेसहा टीएमसी पाणी सोडण्यात येईल, अशी घोषणा कार्यकारी अभियंता जे. बी. नान्नोर यांनी केली आहे.
नगरपरिषद निवडणूक आचारसंहिता अधिवेशन आणि कालवा सल्लागार समितीची बैठक लांबल्याने आवर्तनाचा निर्णय वारंवार पुढे ढकलला जात होता.
शेवटी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्तक्षेपानंतर आवर्तनाचे नियोजन निश्चित झाले. कुकडीमधील पाणीसाठा चांगला असूनही आवर्तनाला विलंब का, हा प्रश्न शेतकरी दररोज विचारत होते.
धरणात २७.४८ टीएमसी उपयुक्त साठा असताना पाणी सोडले जात नव्हते असे शेतकरी म्हणत होते. धरणात पाणी मुबलक, पण निर्णय मात्र कागदावर अडकलाय.
परंतु, आता पाणी सोडण्याचे आदेश तातडीने देण्यात आले. पहिल्या आवर्तनात कुकडी डावा कालवा: ४ टीएमसी इतर कालवे: २.५ टीएमसी अशा ६.५ टीएमसी पाण्याची सोय करण्यात आली आहे.
या पाण्यावर गहू, द्राक्ष, डाळिंब, कांदा, ऊस आणि भाजीपाला पिके अवलंबून असल्याने हा निर्णय निर्णायक ठरला आहे.
अधिक वाचा: पुणे जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने केले राज्यात सर्वाधिक उस गाळप; साखर उताऱ्यात कोण पुढे?
