मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या संततधार पावसामुळे गोंदिया जिल्हावासीयांना सुखावले असतानाच आता रविवारी (दि. ६) अत्याधिक पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १७४ मि.मी. पाऊस बरसला आहे. अशात आता अत्याधिक पावसाचा इशारा मिळाल्याने जिल्हावासीयांना धडकी भरली आहे.
जून महिन्यात पावसाने दगा दिला व मधामधात बरसलेल्या पावसामुळे शेतीची कामे ही शेतकऱ्यांना सुरू करता आली नाही. मात्र, २७ जूनपासून वरुणराज मेहरबान झाले व संततधार पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला. यानंतर आतापर्यंत सरासरी १७४ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला असून शेतीच्या कामांनाही आता चांगला वेग आहे.
शिवाय, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे. असे असतानाच आता हवामान खात्याने रविवारी (दि. ६) अत्याधिक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात आता कुठे पावसाला सुरुवात झाली असून आणखी भरपूर पावसाची गरज आहे. अत्याधिक पावसाचा इशारा असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे.
सर्वाधिक पाऊस अर्जुनी-मोरगाव तालुक्यात
मागील काही दिवसांपर्यंत गोंदिया तालुक्यावर वरुणराज मेहरबान असतानाच आता ते अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर प्रसन्न दिसत आहे. जिल्ह्यात अर्जुनी-मो अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधिक २३३.१ मि.मी. पाऊस बरसला आहे. तर त्यानंतर आमगाव तालुक्यात २१३.७मि.मी. पाऊस बरसला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर गोंदिया तालुका असून २०१.३ मि.मी. पाऊस बरसला आहे. या तीनच तालुक्यांत २०० मि.मी.वर पाऊस बरसला असून सर्वांत कमी १०६.४ मि.मी. पाऊस तिरोडा तालुक्यात बरसला आहे.