सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून वर्षात ३ वेळा पाणी सोडू. पहिले आवर्तन शनिवार, ४ जानेवारी रोजी सुरू होईल.
दुसरे आवर्तन १ मार्च तसेच तिसरे आवर्तन १ एप्रिल रोजी नियोजित आहे. दुसरे आवर्तन सोडण्यापूर्वी उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊ.
उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये. त्यासाठी आवश्यक नियोजन आतापासूनच करा, अशी सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांनी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना केली.
जलसंपदा मंत्री विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. नियोजन समितीच्या सभागृहात त्यांनी सकाळी उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली.
या बैठकीला खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सु सा. खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोषकुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.
तसेच या बैठकीला युवा कल्याण व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आदींनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.
भीमा नदीवर ११ बॅरेजेस प्रस्तावित
- उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९६.९२ टक्के इतका उपलब्ध आहे. मागील वर्षी ६६ टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.
- धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये. तसेच सोडलेल्या आवर्तनातून पाण्याची बचत करावी, असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
- जलसंपदा विभागाने भीमा नदीवर ११ बॅरेजेस प्रस्तावित केलेले आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे. यातील जास्तीत जास्त बॅरेजेस मंजूर करू, अशी माहिती यावेळी विखे पाटील यांनी दिली.
पाच वेळा पाणी सोडण्याचे नियोजन करा
- मागच्या वर्षी केवळ ६६ टक्के पाणीसाठा असताना पाच वेळा पाणी सोडले. आता तर उजनी ९६ टक्के भरले आहे. त्यामुळे वर्षातून ५ वेळा पाणी सोडा.
- तसेच सोलापुरात मे व जून दरम्यान पाणी टंचाई निर्माण होते. पाऊस लांबतो. त्यामुळे जून दरम्यान पाणी टंचाई निर्माण होऊ नये, याचे आतापासूनच नियोजन करा.
- जूनपर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा सोलापूरसाठी राखून ठेवा, अशी मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विखे पाटील यांच्याकडे केली.
- लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर विखे पाटील म्हणाले, पाणी सोडण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ, आवश्यक सूचना मागवू.