Join us

Ujani Dam Water Level : 'उजनी'तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:38 IST

भिगवण पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यामध्ये धास्ती भरली आहे.

तुषार हगारेभिगवण पुणे-सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यामध्ये धास्ती भरली आहे.

गतवर्षी दौंड तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान असणारा पाणलोट क्षेत्र कोरडे पडले होते. तसेच, या वर्षीही पुनरावृत्ती होईल?, अशी धास्ती शेतकरी वर्गात भरली आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी जलाशयातून दुसरे आवर्तन सोडले असल्याने पाणी पातळीत वेगाने घट होत आहे.

चालू वर्षी उजनी धरण १११ टक्के भरले होते. डिसेंबर महिन्यात पहिले आवर्तन सोडले, यामध्ये ५ टीएमसी नदीमधून सोडले आणि १७ फेब्रुवारीपासून दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. तसेच, कालव्यातून झालेली आवर्तन वेगळीच आहेत. आणखीन आता पुढे १० मार्च च्या पुढे एक आवर्तन होईल.

सोलापूर जिल्ह्याच्या शेतीला या पाण्याची आवश्यकता आहेच हे कोणीही नाकारत नाही. उपसा सिंचन योजना यासुद्धा चालल्या पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सुद्धा जगाला पाहिजे.

मात्र, ज्या पद्धतीने पाणी जाते आणि त्याचा उपयोग किती होतो व कोणाला होतो. हा विषय संशोधनाचा आहे. यावर पुणे जिल्ह्यातील पुढारी अगदी झोपेत आहेत की, झोपेचे सोंग घेऊन बसलेत, हे मात्र कळायला मार्ग नाही.

उजनी जलाशयाच्या पाण्यावर दौंड, इंदापूर, कर्जत, करमाळा तालुक्यांतील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णता उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

पाणी पातळी खाली गेल्यावर विद्युत पंप पाण्यासोबत खाली नेण्याची धडपड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. धरणाची पाणी पातळी ५३ टक्क्यांवर आली आहे. यामुळे पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यास यापुढील काळात पाणी कपातीची वेळ शेतकऱ्यावर येऊ शकते.

कालवा सल्लागार समितीच्या बिसाळ कारभारामुळे व उजनी धरणाच्या खालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीरपणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेले धरण रिकामे होत असून, दोन महिन्यांत ५० टक्के पाणी संपलेले असून, नियोजन बाह्वा पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजामध्ये प्रवेश करेल.

बुडीत बंधारे कधी होणार?पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधल्यास पाणी पातळी खालावल्यास शेतकरी वर्गासह पाणी वापर संस्थाना पाणी वापरण्यासाठी बुडीत बंधारे वरदान ठरतील निवडणुकांच्या काळात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात बुडीत बंधारे बांधण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, बुडीत बंधाऱ्याची निर्मिती कथी होणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना तहान लागल्यावर भेडसावतो.

५०  टक्के धरणातील पाणी दोन महिन्यातच संपत आले आहे.नियोजन बाह्य पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजामध्ये प्रवेश करेल. त्यामुळे हे पाणी समांतर जलवाहिनीने सोलापूरला सोडण्याची आवश्यकता आहे.

सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी जलाशयातून नदी वाटे पाणी सोडण्याच्या पद्धती मुळे २५ ते ३० टीएमसी पाणी अनाठायी वाया जाते. त्यामुळे सोलापूर शहराला पाणीपुरववठा करण्याकरिता तयार होत असलेल्या समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ पूर्ण करून ती कार्यान्वित करावी. - प्रा. शिवाजीराव बंडगर, उजनी धरण संघर्ष समिती

टॅग्स :उजनी धरणपाणीसोलापूरशेतकरीशेतीइंदापूरकर्जतधरणपुणेभिगवणनदी