गणेश पोळ
टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी ७२.१९ टक्के असून, धरणात एकूण १०२.३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ४ फेब्रुवारी रोजी उजनी वजा ८ टक्के होते.
सध्या रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येत असून, शेतकऱ्यांचा मागणीनुसार पुढील दहा ते पंधरा दिवस पाणी सुरू राहणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी दिली.
सध्या उजनी धरणात ३८.६८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनीतून डिसेंबरपासून सोडण्यात आले होते, तर रब्बी हंगामातील पिकांसाठी ४ जानेवारीपासून सुरू आहे.
उजनी एप्रिलअखेर ते मेचा पहिल्या आठवड्यात साधारण मायनसमध्ये जात असते. यावर्षी पावसाळा उशीरपर्यत झाल्याने, धरण व्यवस्थापनाने पाण्याचे योग्य नियोजन करून मे अखेरपर्यंत या वर्षीचा उन्हाळी पिकांना पाणी मिळण्याची आशा आहे.
सोलापूर शहराला तसेच भीमा नदीकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणखी दोन पाळ्या भीमा नदीतून सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
यासाठी दहा ते बारा टीएमस पाणी लागणार आहे. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जादा असतो. यासाठी पाच ते सहा टीएमस पाणी बाष्पीभवनातून संपत असते.
उन्हाळ्यात जपलेली पिके मे अखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यात करपून जातात. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
वजा ३० टक्क्यांपर्यंत कालव्यातून पाणी सोडले जाऊ शकते. फेब्रुवारी अखेर एक महिना शेतीसाठी गॅप दिल्यास पावसाळ्यापर्यंत शेतीसाठी पाणी उपयुक्त ठरू शकते.
गतवर्षी २१ जानेवारी २०२४ रोजी उजनी धरण मृत साठ्यात गेले होते, तर उजनी केवळ ६०.६६ टक्के भरले होते. गेल्यावर्षी सलग तीन महिने कालव्यातून पाणी सोडल्याने मेअखेरपर्यंत पिके करपली होती. परंतू यंदा तलावात पाणीसाठा समाधानकारक आहे.
सलग पाच महिने दौंड येथून विसर्ग
१) यावर्षी ९ जून पासून दौंड येथून उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली होती. ८ नोव्हेंबरपर्यंत दौंड विसर्ग सुरू होता, तर उजनी पूर्ण क्षमतेने १११.२४ टक्के भरले.
२) गतवर्षी ७ जून २०२४ पर्यंत उजनी २ धरणाची पाणी पातळी वजा ५९.९९ टक्के इतकी खालावली होती. ८ जूनपासून उजनी पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. २६ जुलै रोजी उजनी मृत साठ्यातून बाहेर येऊन प्लस झाले.
अधिक वाचा: नीरा खोऱ्यातील धरणांत मागील वर्षापेक्षा जास्त पाणी; शेतीला मिळणार उन्हाळी पाणी