टेंभुर्णी : भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्ग सुरू झाला असून, १० हजार ६८४ क्युसेक विसर्ग सायंकाळी उजनी धरणात मिसळत आहे.
गेल्या २४ तासात ४ टक्के पाणी पातळी वाढली असून, आठ दिवसात ५ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. रविवारी सायंकाळी वजा १४.३३ टक्के पाणी पातळी झाली होती तर ५६ टीएमसी पाणी साठा झाला आहे.
उजनी धरण परिसरात शनिवारी ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रविवारीदेखील उजनी परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. गेल्या आठ दिवसात १७० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
१०० टक्के भरलेले उजनी १८ एप्रिल रोजी मृत साठ्चात गेले होते. तर, वजा २२.९६ टक्केपर्यंत पाणी पातळी खाली गेली होती.
मान्सून जरी दाखल झाला तरी जून व जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील पिके करपून जातात. यामुळे मे, जून व जुलै महिन्यात काय होणार याची काळजी शेतकऱ्यांना लागून राहिली होती.
मात्र, मे महिन्यात जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नीरा नदीत लाटे येथे २६ हजार कुसेक विसर्ग असून तो भीमा नदीत संगम येथे मिसळणार आहे.
मे महिन्यात दौंडमधून विसर्गाची पहिलीच वेळ
◼️ उजनी पाणलोट क्षेत्रातील भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दौड येथून उजनीत विसर्ग सुरू झाला असल्याने यामुळे उजनी मृत साठ्यातून लवकरच बाहेर येण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
◼️ गतवर्षी ४ जूनपासून दौंड विसर्ग सुरू झाला होता. साधारण जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात दौड विसर्ग सुरू होत असतो. दौंड येथून में महिन्यात उजनीत विसर्ग सुरू होण्याची येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अधिक वाचा: नक्की मान्सून आलाय का? पेरणीचे नियोजन करावे का? जाणून घ्या सविस्तर