चपळगांव : एकरुख योजने अंतर्गत उजनी धरणातूनपाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी मागील पंधरा दिवसांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावशिवारात खळखळत आहे.
अखेर शनिवार, दि.२५ रोजी दुपारी दर्शनाळ कालव्याच्या माध्यमातून पाणी कुरनूर धरणाकडे सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मागील वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील विविध जलस्रोत यापूर्वीच आटले आहेत. यामुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
नागरिकांना व मुक्या जनावरांना त्रास होऊ नये यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाणी सोडण्याविषयी मागणी केली होती.
या पाण्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात फायदा झाला. दरम्यान, कुरनूर धरण कालवा सल्लागार समितीची बैठक मागील आठवड्यात संपन्न झाली.
यामध्ये कुरनूर धरणाखालील आठही बंधारे भरून घेण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. कुरनूर धरणातून येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
प्रतिसेकंद २४०० लिटर पाण्याचा प्रवाह सुरू
दर्शनाळ कालव्यातून प्रति सेकंद २४०० लिटर म्हणजे २.४४ क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. उजनीतून पहिले आवर्तन संपेपर्यंत हे पाणी कुरनूर धरणात सोडण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.