उजनी धरणातून १ लाख २६ हजार तर वीर मधून ८ हजार क्युसेक मिळून भीमा नदीत १ लाख ३४ हजार क्युसेक विसर्ग येत आहे.
यामुळे सोमवारी पंढरपूर येथे इशारा पातळीवरून वाहणारी चंद्रभागा नदी मंगळवारी धोक्याच्या पातळीवरून वाहणार आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली प्रशासनाने सोमवारी रात्री सुरु केल्या आहेत. या पुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून नदीवरील आठ बंधारे व पाच पुलावरील वाहतूक बंद आहे.
दोन्ही धरणातून येणारा विसर्ग आणि पंढरपुरातील स्थानिक ओढे, नाल्यांचा विसर्ग पाहता मंगळवारी भीमा नदी १ लाख ५० हजार क्युसेक विसर्ग राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूर येथील संभाव्य पुराचा धोका वाढला आहे.
पंढरपूर येथे भीमा (चंद्रभागा) इशारा पातळीवरून वाहणारी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पुराच्या पाण्यात अर्धी बुडाली आहेत.
मंदिरांना पाण्याचा वेढा कायम आहे. तर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ही पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक गेली दोन आठवड्यांपासून बंदच आहे.
भीमा नदीवरील हे बंधारे, पूल पाण्याखाली..
आंबेचिंचोली ते उचेठाण बंधारा, पिराची कुरोली ते पट. कुरोली बंधारा, पिराची कुरोली ते खळवे पूल, अजनसोंड ते मुंढेवाडी बंधारा, नळी ते बठाण बंधारा, वाखरी लहान पूल, पंढरपूर दगडी पूल व बंधारा, शेळवे कासाळगंगा पूल, सरकोली ते पुळूज बंधारा, सरकोली ते उचेठाण पूल, सरकोली ते पुळूज बंधारा, पुळूज ते पुळूजवाडी ओढ्यावरील पूल, गुरसाळे ते कौठाळी बंधारा.
उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. हे पाणी पंढरपूर येथे मंगळवारी सकाळी दाखल होईल. परंतु संभाव्य पुराचा धोका ओळखून व्यासनारायण झोपडपट्टीतील कुटुंबांचे रातोरात स्थलांतर करण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून त्यांची व्यवस्था रायगड भवन येथे केली आहे. - सचिन लंगुटे, तहसीलदार, पंढरपूर
अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?