मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कोकण किनारपट्टीसह विविध ठिकाणी मुसळधारेचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग अधिक राहाणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला तटरक्षक दलाने दिला आहे.
मराठवाड्यात २९ ऑक्टोबरपर्यंत काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल. लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळ किनाऱ्यावरही २७ ऑक्टोबरपर्यंत वादळावाऱ्यांसह पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत.
चार राज्यांना इशारा
◼️ मोंथा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेता आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि ओडिशाला खरबदारीचा इशारा देण्यात आला आहे.
◼️ भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी काकीनाडाजवळील मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: जमीन मोजणीसाठी आता वाट पाहू नका; 'ह्या' नवीन प्रणालीने मोजणी होणार फक्त ३० दिवसांत
