भोर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा देवघर आणि भाटघर धरणातून अनुक्रमे ६,८०० क्यूसेक आणि २०,५१४ क्युसेक, असा एकूण २७,३५४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरु आहे.
यामुळे नीरा नदीच्यापाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, पावसाची हीच तीव्रता कायम राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
परिणामी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, या पावसाचा भात पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरले◼️ ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के क्षमतेने भरले असून, धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १,६१४ क्युसेक आणि स्वयंचलित द्वाराद्वारे १८,९०० क्युसेक, असा एकूण २०.५१४ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.◼️ धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात बदल होऊ शकतो. दुसरीकडे, निरादेवधर धरण २७.८५ टक्के भरले असून, सांडव्याद्वारे ६८०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.◼️ पावसाच्या प्रमाणानुसार आणि पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात आवश्यक ती वाढ किंवा घट होऊ शकते, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.
टेमघर धरण भरले◼️ टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात अधिक पर्जन्यवृष्टी होत असून टेमघर धरण जलाशय १००% क्षमतेने भरले आहे.◼️ धरणाच्या सांडव्यावरून ३२२ क्युसेक व जलविद्युत निर्मिती केंद्राद्वारे ३०० क्युसेक असा एकूण ६२२ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग नदी पात्रात चालू आहे.
वीर धरणातूनही विसर्ग◼️वीर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी ८ वाजता नीरा नदीपात्रात २४,३०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.◼️ पाण्याची आवक आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता, नदीपात्रातील विसर्गात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.◼️ यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी केले आहे.◼️ सर्व नागरिकांनी जलसंपदा विभाग आणि प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला◼️ आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणात दहा हजार क्युसेकने पाणी येत आहे, तर धरणाच्या पाच गेटद्वारे पाच हजार क्युसेकने पाणी घोड नदीपात्रात सोढण्यात आले आहे.◼️ या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा कुकडी पाटबंधारे विभागाने दिला आहे.◼️ दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ओढ्या-नाल्यांना व नद्यांना पूर आले आहेत.◼️ २० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे.
अधिक वाचा: राज्यातील साडेसात हजार खतविक्रेत्यांना कृषी विभागाचा 'हा' इशारा; अन्यथा दुकानांना टाळे लागणार