भोर : भोर, बारामती आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास १०० टक्के भरले आहे.
धरणातून ५ स्वयंचलित दरवाजांमधून १,४०० क्युसेक आणि वीजनिर्मिती केंद्रातून १,६५० क्युसेक, असे एकूण ३,०५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शाखा अभियंता गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषतः भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
पाटबंधारे विभाग, पुणे येथील कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांनी सांगितले की, धरण पूर्णपणे भरल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाटघर धरणाची वैशिष्ट्ये
पाणी साठवण क्षमता : २३ टीएमसी
दरवाजांची संख्या : एकूण ८१ (४५ स्वयंचलित, ३६ रोलिंग)
विसर्ग क्षमता : एका वेळी ५७,००० क्युसेक
सध्याचा विसर्ग : ३,०५० क्युसेक (५ स्वयंचलित दरवाजांमधून)
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषतः भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यातील पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली.
अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अॅप