सोलापूर : सीना-कोळेगाव, चांदणी आणि खासापुरी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात रविवारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. हे तीन प्रकल्प आणि भोगावती नदीतील पाणी अशा एकूण चार ठिकाणाहून सीना नदीत १ लाख ३५ हजारांचा विसर्ग सुरु आहे.
माढा तालुक्यातील रिधोरे, तांदूळवाडी, उंदरगाव, राहुल नगर या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी केले.
सीना नदीच्या पात्रात २२ ते २३ सप्टेंबर यादरम्यान दोन लाखांहून अधिकचा विसर्ग येत होता. त्यामुळे माळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला.
मोहोळ तालुक्यातील लांबोटीच्या उड्डाणपुलावर पाणी येऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. रविवारी रात्री पावसाचा जोर वाढला त्यामुळे चार प्रकल्पांचे पाणी सीना नदीत येणार आहे.
सोमवारी रात्रीनंतर पावसाचा जोर वाढला तर महामार्गावर पुन्हा पाणी येऊ शकते, अशी शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सोलापूर शहरातील काही भागाला आदिला नदीच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
भीमा नदीकाठची परिस्थिती नियंत्रणात
उजनी धरणातून शनिवारी साधारण १ लाख क्युसेकचा विसर्ग होता. रविवारी त्यात घट करून रात्री ११ वाजता भीमा नदीत ७५ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या नदीकाठची सध्याची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र नदीकाठावरील सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत.
भीमा नदी (विसर्ग क्युसेक)
सकाळी ०६:०० वाजता - ५० हजार
सकाळी ०७:०० वाजता - ४० हजार
सायंकाळी ०५:०० वाजता - ५० हजार
सायंकाळी ०७:०० वाजता - ६० हजार
सीना नदी
सकाळी ९ वा. - १ लाख २८ हजार ४७८
सकाळी १० वा. - १ लाख ४४ हजार १९२
सायंकाळी ६ वा. - १ लाख ५२ हजार ३१८
रात्री ९ वा. - १ लाख ६२ हजार ४४९
अधिक वाचा: Purgrasta Madat : पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार