१५ ऑगस्टपर्यंत महिन्याची पावसाने सरासरी ओलांडली असून, उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधिक १६१ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पाडला आहे. ऑगस्टमध्ये उत्तर तालुक्यात २१६ मि.मी., तर जिल्हात एकूण ११४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जून-जुलै महिन्यात जेमतेम पडलेल्या पावसाला ऑगस्ट महिन्यात चांगलाच सूर गवसला आहे. सोलापूर जिल्ह्यात इतर तालुक्यात पाऊस जेमतेम असला तरी उत्तर तालुक्यात सर्वाधिक व पिकांसाठी नुकसानकारक पडत आहे.
ऑगस्ट महिन्यात उत्तर सोलापूर तालुक्यात तब्बल २१६ मि.मी. पाऊस पडला आहे. उत्तर तालुक्याचा ऑगस्ट महिन्याचा सरासरी पाऊस १३३ मि.मी. इतका आहे. ऑगस्ट महिन्याचे आणखीन १६ दिवस शिल्लक असताना उत्तर तालुक्यात २१६ मि.मी. म्हणजे १६१ टक्के इतका पाऊस झाला. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पावसाची सरासरी १०७.५ मि.मी. इतकी आहे. १५ ऑगस्ट पर्यंत जिल्हात ११४ मि.मी. म्हणजे १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस पडला.
अक्कलकोट तालुक्यातील किणी, दक्षिण तालुक्यातील बोरामणी व मुस्ती, तसेच उत्तर तालुक्यातील तिर्हे, मार्डी, वडाळा, शेळगी व सोलापूर मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सहा किलोमीटर अंतरावरील दोन गावात पावसाच्या नोंदीचा मोठा फरक आहे. उत्तर तालुक्यात पाणी फौंडेशनचे जलमित्र स्वखर्चातून पर्जन्यमापक बसविले.
सावळेश्वर अन् बीबीदारफळ
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ हे गाव मार्डी मंडलात असून मार्डी मंडलात ऑगस्ट महिन्यात २६६ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर मंडळात सावळेश्वर गावात १०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बीबीदारफळ व सावळेश्वर या दोन्ही गावांतील अंतर अवघे सहा किलोमीटर आहे. पावसात मात्र १५८ मि.मी. ची तफावत आहे.
गावाला सतर्कतेचा इशारा; बंधाऱ्याजवळ जाणे टाळा
• सीना नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, नदीवरील बंधाऱ्याजवळ पाणी असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
• सीना नदीवरील पाकणी, शिंगोली, अकोले (मंद्रूप) व नंदूर येथील बंधाऱ्याजवळ पाणी आले आहे. सीना नदीत जवळपास ३० हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. पावसाचे दिवस असल्याने नदीत पाण्याचा चढउतार सुरू आहे.
• बार्शी तालुक्यातील काही भाग व उत्तर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्यातील सरासरी पाऊस
उत्तर सोलापूर - २१६
दक्षिण सोलापूर - १७९
बार्शी - १४७
अक्कलकोट - १४१
मोहोळ - १२०
माढा - ११२
करमाळा - ४३
पंढरपूर - ७९
सांगोला - १०१
माळशिरस - ७९
मंगळवेढा - ७०
एकूण १४४ मिमी पाऊस
खरीप पिकातले पाणी ओसरेना
• अक्कलकोट तालुक्यात यावर्षी मे महिन्या पासून पावसाला सुरुवात झालेला आहे व आता ऑगस्ट महिन्यात गेल्या आठ दहा दिवसापासून दररोज पाऊस येत असल्याने खरीप पिकामध्ये पाणी साचून पिके कुजत आहेत.
• सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत व पाऊस नेहमी पडत असल्याने नद्यांना पूर येऊन शेती, रस्ते, पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. शेतकऱ्यांचे उडीद, मुग, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, कांदा, भाजीपाला, ऊस, तूर ही पिके अद्याप पाण्यातच आहेत.
• काहींची पिके मातीसह वाहून जात आहेत. मे, जून महिन्यात झालेल्या पावसावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर महिना दीड महिना पाऊस गायब झाला.
• मात्र ज्या शेतकऱ्याजवळ पाणी उपलब्ध होते त्याने स्पिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले. लहान मुलासारखे पिकांचे जतन करून, आता हाता तोंडाला आलेले खरीप पिक सतत पडणाऱ्या पावसामुळे नुकसान होत आहे.