कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची उघडीप राहिली. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. शनिवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दीड फुटाने कमी झाली.
शनिवारी सकाळी दहा वाजता जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर पूर्णपणे उघडीप राहिली. दिवसाचे किमान तापमान २४, तर कमाल २९ डिग्रीपर्यंत पोहोचल्याने अंग तापून निघत होते.
शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक २४ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात ४ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ८५ हजारांचे नुकसान झाले आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेंकद ३१००, वारणातून प्रतिसेंकद ४५००, तर दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी हळूहळू कमी होत आहे. पावसाची पूर्ण उघडीप राहिल्याने शनिवारी दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी दीड फुटाने कमी झाली.
हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर