पारनेर : कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शुक्रवारपासून (दि.२६) कुकडी डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.
३५ ते ४० दिवस हे आवर्तन चालणार असून, कांदा लागवडीसाठी व रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फायदा होणार आहे.
कांद्याच्या दरात झालेली दरवाढ आणि हिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कांदा लागवडीसाठी वेळेवर पाणी मिळावे, यासाठी दाते यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पाठपुराव्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी कुकडी सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव व कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर यांच्याशी संपर्क साधत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
कालवा दुरुस्तीची कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यानंतर दाते यांच्याशी संपर्क करुन २६ डिसेंबर रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला.
रब्बी हंगामातील कांदा पीक हा पारनेर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक वाचा: राज्यातील 'ह्या' महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना मिळणार तब्बल चौपट मोबदला
