कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली, तरी गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत जोरदार सरी कोसळत आहेत.
धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २२.०२ फुटांपर्यंत गेली असून, २४ बंधारे पाण्याखाली आहेत. आज, रविवारीही जिल्ह्यासाठी 'येलो अलर्ट' दिला आहे.
शनिवारी पहाटेपासून ग्रामीण भागात जोरदार कोसळला. कोल्हापूर शहरात उघडझाप असली तरी गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस राहिला.
धरणक्षेत्रातही पाऊस जोरदार होत असल्याने विसर्ग कायम आहे. राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून, धरणातून प्रतिसेकंद २९२८ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे.
त्यामुळे भोगावतीच्या पातळीत वाढ होत आहे. वारणा धरणातून ४,८५२, तर दूधगंगातून ४,६०० घनफूटचा विसर्ग कायम आहे. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सकाळी २२.०२ फुटांवर होती, पावसाची रिपरिप असली तरी पंचगंगा नदीची पातळी कमी होत गेली. सकाळी २३ फूट होती, सायंकाळी आठ वाजता ती २२.०२ फुटापर्यंत खाली आली. विसर्ग जास्त असल्याने पातळी कमी होत आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवार (दि. ३) पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' दिला असून विशेषता घाट माथ्यावर जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पडझडीत १.७९ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात बारा खासगी मालमत्तांची पावसामुळे पडझड झाली आहे. यामध्ये १ लाख ७९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दहा मार्ग बंद
जिल्ह्यात ४ इतर जिल्हा मार्ग तर ६ ग्रामीण मार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रंकाळा ते दिंडनेर्ली मार्गावर पाणी असल्याने वाहतूक इतर मार्गाने वळवली आहे.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र