Maharashtra weather Update : मागील आठवड्यापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. गेल्या आठवड्यात नागरिकांनी कडक्याच्या थंडीचा अनुभव घेतला. मात्र, आता ही थंडी गायब झाली असून राज्यात आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून १० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात बहुतांश जिल्ह्यात आज ढगाळ हवामान राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. राज्याच्या इतर भागात किमान तापमानात वाढ झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान आहे. यामुळे थंडी जाणवत नाही. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवत आहेत.
त्यामुळे अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याचा परिणाम राज्यावर होताना दिसत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
या जिल्ह्यांत पाऊस
* राज्यात आज (५ डिसेंबर) रोजी कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधूदुर्ग जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
* मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
* मराठवाड्यातील अहिल्यानगर, धाराशिव व लातूर जिल्ह्यात मुसळधार तर बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातून थंडी गायब
राज्यात सध्या उष्ण व कोरडे हवामान असून काही ठिकाणी ढगाळ हवामान असल्याने पिकांवर याचा परिणाम होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पारा वाढला आहे. बदललेल्या या वातावरणाचा प्रतिकूल परिमाण पिकांवर होणार असून उत्पन्न घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाडीप बघून फवारणी करावी.
* द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड १० मिली प्रति लिटर (१० पीपीएम) पाण्याच्या द्रावणात बुडवावेत.
* पुर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.