Maharashtra Weather Update : राज्यात काही भागात थंडीचा काही अंशी कमी झाली आहे. परंतू उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे एकीकडे राज्यात पहाटे गारवा आणि धुक्याची चादर (A sheet of fog) दिसून येत आहे. तर दुसरीकडे किमान तापमानात वाढ झाली असून ढगाळ हवामानामुळे पावसाची हजेरी लावणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Condition of cyclonic winds) पंजाब आणि त्याला लागून पाकिस्तानच्या परिसरात आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण आहे. तर दक्षिणेतही जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असून ढगाळ हवामान असल्याने राज्यात येत्या २४ तासांत किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पश्चिम हिमालयीन भागात नव्याने पश्चिमी चक्रावात (Western Cyclone) तयार झाला असून पुढील ४ दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबसह महाराष्ट्रातविदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून तापमानात काही अंशी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दिवसा पारा वाढला
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. तर दिवसाचे तापमान हे वाढताना दिसत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले. परंतू पहाटे हलका गारवा आणि धुकेही आहेत.
राज्यात मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई भागात पारा १६-१८ अंशांपर्यंत नोंदवला जात आहे. तर मराठवाड्यात १८-२० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, आता तापमान येत्या २४ तासांत परत एकदा वाढणार आहे. २ अंश सेल्सिअसने साधारण तापमानात वाढ नोंदवली जाणार आहे. तर विदर्भात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरींची हजेरी लागू शकते.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे.