Maharashtra Weather Update : उत्तर पश्चिम भारतात येत्या ३ दिवसात सर्वात कमी तापमान (Reduction Temperature) असणार आहे. ३ किंवा त्याहून अधिक तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा ३ अंश सेल्सिअसने तापमान वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत(Bay of Bangal) आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) तयार झाले आहे. या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव सध्या राज्यातील हवामानावर(Weather) दिसून येत आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाचा अंदाज तर उत्तरेकडे पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी अश्या स्वरुपाचे हवामान पाहायला मिळत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासात हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये १० अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी कोणताही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला नाही.
'या' ठिकाणी पावसाची शक्यता
येत्या ४८ तासात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रायगड, पालघरमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगरमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ४ दिवस पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबईतील काही भागात सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. तसेच सकाळी थंडीही वाढत आहे. किमान तापमानात अनेक भागात घट झाली असून दुपारी जाणवत असलेला उकाडाही कमी झाला आहे. मुंबईत मात्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही.
विदर्भात काल (१० जानेवारी) रोजी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भात नागपूरमध्ये आज कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल. तसेच येथील हवामान ढगाळ असण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे.