प्रसाद आर्वीकर /विजय मुंडे
वाढते तापमान, जलसाठ्यांचे झपाट्याने होणारे बाष्पीभवन आणि खालावत चाललेली भूजल पातळी यामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. (Maharashtra water crisis)
एप्रिल अखेरच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.(Maharashtra water crisis)
काही ठिकाणी टँकर प्रस्तावित असले तरी प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.(Maharashtra water crisis)
'जलजीवन' असूनही ३०८ गावे टंचाईत
हिंगोली : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी 'जलजीवन मिशन' राबविण्यात आले. मात्र, चार वर्षांनंतरही जिल्ह्यातील ६५६ पैकी ३०८ गावांमध्ये योजना अपूर्ण आहे.
सध्या केवळ ३४८ गावांत नियमित पाणीपुरवठा सुरू असून उर्वरित गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.
ग्रामस्थांना दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेनंतरही प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लोकांना विहिरी, शेतातील बोअरवेल किंवा दूरवरून पाणी आणावे लागत आहे.
भूजल पातळी आणि प्रत्यक्ष स्थितीतील तफावत
जिल्ह्यातील भूजल पातळी मार्च महिन्यात ७.७३ मीटर नोंदवली गेली असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत ०.३१ मीटरने वाढ दिसून येते. मात्र, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यांत भूजल पातळी घटली आहे.
भूजल पातळी आकडेवारीत स्थिर दिसत असली तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई तीव्रतेने जाणवत आहे.
धरणांत पाणी असूनही टंचाई कायम
हिंगोली जिल्ह्यातील इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पांत मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा चांगला आहे:
इसापूर : ६१.२२%
येलदरी : ६४.७९%
सिद्धेश्वर : मर्यादित साठा
तरीदेखील वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई कायम आहे.
टँकर प्रस्तावित, पण सुरू नाहीत
हिंगोली तालुक्यातील खांबाळा आणि औंढा नागनाथ तालुक्यातील सेवादास तांडा येथे टँकर प्रस्तावित आहेत. मात्र, अद्याप एकाही ठिकाणी टँकर सुरू नाही, त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जालना जिल्ह्यात स्थिती गंभीर
जालना : एप्रिल अखेरच जिल्ह्यातील पाणीटंचाई टोकाला पोहोचली आहे.
१८ गावे आणि १३ वाड्यांना ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
तब्बल ६१ हजारांहून अधिक नागरिक टँकरवर अवलंबून आहेत.
तालुकानिहाय स्थिती
बदनापूर : १७ टँकर (८ गावे + १३ वाड्या)
जाफराबाद : १२ टँकर (७ गावे)
भोकरदन : ५ टँकर (३ गावे)
मंजूर ६० टँकरपैकी केवळ ३४ टँकर सुरू असल्याने पाणीपुरवठा अपुरा ठरत आहे.
प्रकल्पांची चिंताजनक स्थिती
७ मध्यम प्रकल्प : ४९.०५% साठा
६० लघु प्रकल्पांपैकी
१० 'डेड स्टोरेज'मध्ये १ पूर्ण कोरडा
एकूण ६७ प्रकल्पांपैकी ५३ प्रकल्पांमध्ये ५०% पेक्षा कमी साठा
यामुळे मे महिन्यात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लातूरमध्ये विहिरींचे अधिग्रहण
लातूर जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर बनत असून २२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जळकोट परिसरातही पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत.
मराठवाड्यात पावसाळ्यानंतरही उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट कायम राहत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
जलसाठा उपलब्ध असूनही वितरण व्यवस्थेतील त्रुटी, अपूर्ण योजना आणि वाढते तापमान यामुळे ग्रामीण भागात परिस्थिती गंभीर बनली आहे.
येत्या मे महिन्यात ही टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
