Maharashtra Weather Update : सप्टेंबर अखेरचा टप्पा ओलांडतानाही पावसानं मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. (Maharashtra Weather Update)
काही भागांत तापमान वाढल्यामुळे उकाड्याचा त्रास जाणवतोय, तर काही ठिकाणी पावसाळी ढगांमुळे नागरिकांना सूर्यदर्शनही झालेले नाही. दरम्यान, हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी ओडिशा, गुजरात, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्याने आणि तो गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाची तीव्रता घटली आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत पाऊस-उन्हाचा खेळ सुरू राहील.
मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा जोर ओसरल्याने पूरस्थिती हळूहळू आटोक्यात येते आहे.
नांदेडसाठी मात्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यलो अलर्ट जारी
केंद्रीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये तुलनेने पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. यंदा दसऱ्यानंतर पावसाचा पूर्ण उघडीप मिळेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात नवी प्रणाली सक्रिय
एकीकडे पावसाचा जोर कमी होत असतानाच बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची प्रणाली तयार होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २४ तासांत या प्रणालीचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र ही प्रणाली पुढील काही तासांत कमकुवत झाली तर पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर घटेल.
परतीचा पावसाळा मंदावला
सध्या नैऋत्य मोसमी वारे उत्तराखंड, हिमाचल, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर मधून माघारी फिरले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून या परतीच्या प्रवासाचा वेग मंदावल्याने पावसाळी ढग महाराष्ट्रासह काही राज्यांवर रेंगाळले आहेत. यामुळे पावसाने अधूनमधून हजेरी लावली आहे.
सप्टेंबर अखेरीस महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय आहे?
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश जिल्ह्यांत केवळ हलक्या सरींची शक्यता आहे.
कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो?
ओडिशा, गुजरात, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट.
सध्या पावसाची तीव्रता ओसरली असली तरी बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे परिस्थिती केव्हाही बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सतर्कतेकडे लक्ष ठेवणं गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सोयाबीन काढणीदरम्यान शेतात आर्द्रता असल्यास शेंगा आर्द्र हवेत ठेवू नयेत.
* तूर पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने वेळेवर फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.