Maharashtra Weather Update : कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट दाटलं आहे. हवामान खात्याने आज (२ नोव्हेंबर) रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
पावसाचा जोर ओसरतोय, पण सावधानता आवश्यक
समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव आता कमी झाला असला तरी, काही भागांत अजूनही ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सरी सुरू राहणार आहेत. शनिवारी (१ नोव्हेंबर) रोजी सकाळपर्यंतच्या राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या
रत्नागिरी (लांजा) व सिंधुदुर्ग (रामेश्वर) येथे प्रत्येकी १२० मिमी पावसाची नोंद
दोडामार्ग आणि सावंतवाडी येथे ८० मिमी पाऊस
तापमानात घट
राज्यात कमाल तापमानात घट दिसून येत असून, काही भागात तापमानाचा पारा ३० अंशांखाली गेला आहे.
अमरावती: कमाल तापमान ३३°C
धुळे: किमान तापमान १४.७°C
ढगाळ वातावरणामुळे रात्रीचे तापमान किंचित वाढण्याची शक्यता आहे, परंतु दिवसा गारवा कायम राहील.
'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट
आज (२ नोव्हेंबर) रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांत आकाश ढगाळ राहून तापमानात चढ-उतार होणार आहेत.
उपसागरात नवं कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत
'मोंथा' चक्रीवादळाचे अवशेष पश्चिम बंगाल आणि त्याच्या आसपास सक्रिय असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पूर्व भारतावर दिसतो आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रात गुजरात–महाराष्ट्र किनाऱ्यालगत नव्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होत असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. यामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत असला, तरी अवकाळी सरींचा धोका अद्याप कायम आहे. पुढील दोन दिवसांत काही भागांत हलक्या सरींची शक्यता असून, शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून रब्बी हंगामाच्या तयारीस सुरुवात करावी.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
पावसाचा जोर ओसरत असला तरी, हवामानातील आर्द्रता आणि तापमानातील घट रब्बी हंगामासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना कराव्यात.
*पावसाची शक्यता असल्यास पेरणी काही दिवस पुढे ढकलावी, ज्यामुळे अंकुरणावर पावसाचा परिणाम होणार नाही.
*ओलाव्याचा योग्य वापर करून मळणीपूर्व माती व्यवस्थापन करा, असा सल्ला देण्यात आला.
