Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, २५ मे रोजी संपूर्ण राज्याला ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Red Alert)
राज्यातील शेतकऱ्यांसाठीची दिलासादायक बातमी आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
विजांच्या कडकडाटासह येणारा हा पाऊस जनजीवन विस्कळीत करू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे काल (२३ मे) रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतर झाले आहे. मात्र, अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेले नाही. या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात २४ ते २८ मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रामुख्याने, उद्या रविवारी (२५ मे) रोजी अवघ्या राज्याला रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. शुक्रवारी (२३ मे) रोजी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. ते येत्या २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकणार आहेत.
कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
मान्सूनचा जोर केरळमार्गे
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दोन दिवसांत दाखल होईल. साधारण २५ मे पर्यंत दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
राज्यात उद्या (२५ मे) रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या ४८ तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे.
पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील, असा अंदाज वर्तविला आहे. राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक व नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
* कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.
* मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस. पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर विशेषतः पावसाचा जोर राहणार आहे.
* मराठवाडा : संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता.
* विदर्भ : अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
* उत्तर महाराष्ट्र : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* हवामान विभागाने नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.
* शेतकऱ्यांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये.
* मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.