Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली, दसराहीही पार पडला, तरी पावसाने परतीचा प्रवास सुरू केलेला नाही. यावर्षी पावसाचा मुक्काम भारतासह महाराष्ट्रात वाढला असून अजूनही अनेक भागात पाऊस कोसळत आहे. (Maharashtra Weather Update)
पावसाची स्थिती
सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि सोलापुरात पावसाने जोरदार धुमाकूळ घातला होता. शेतजमिनी, घरे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
ऑक्टोबर महिना सुरू असूनही पावसाचे प्रमाण कमी झालेले नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (३ ऑक्टोबर) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
कोकणातील हवामान
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील. मात्र काही भागांत आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राचा अंदाज
नंदूरबार, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात पावसाचे सावट कायम
मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या हवामानात छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत हलक्या सरी पडतील. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव येथे वाऱ्यासह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि आसपासचे हवामान कसे आहे?
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये सकाळी सूर्यप्रकाशाचे दर्शन झाले असले तरी वातावरणात धुके व ढगाळ हवामान आहे. दुपारनंतर पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम अद्याप सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना छत्री, रेनकोट जवळ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पावसाचा अंदाज पाहता, पिकात, फळबागेत, भाजीपाला व फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.
* फवारणी व आळवणीची कामे जमिनीत वापसा व पावसाची उघाड बघून करावीत, असा सल्ला देण्यात आला.