Maharashtra Weather Update : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात थंडीची चाहूल लागली असून हवेतील गारवा वाढू लागला आहे. (Maharashtra Weather Update)
पहाटे-सायंकाळच्या वेळेस थंड वाऱ्यामुळे थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फबारी सुरू झाली असून, तर दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अद्याप पावसाचे सावट कायम आहे.(Maharashtra Weather Update)
दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा जोर
राजधानी दिल्लीमध्ये आता हिवाळ्याने ठोस पाऊल टाकले आहे. पुढील आठवडाभर किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सकाळी आणि सायंकाळी थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने गारठा अधिक जाणवत आहे.
यासोबतच दिल्ली-एनसीआर परिसरातील हवा गुणवत्ताही पुन्हा खालावत असून, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये AQI धोक्याच्या झोनमध्ये पोहोचला आहे. कमी तापमानामुळे प्रदूषणाचा प्रभाव आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फबारी सुरू
पश्चिम विक्षोभ सक्रिय झाल्याने उत्तर भारतातील उंच भागांमध्ये पुन्हा बर्फबारीचा सिलसिला सुरू झाला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये ४,००० फूटांवरील भागात बर्फाचे थर जमू लागले आहेत.
अनेक ठिकाणी तापमान १० अंश सेल्सियसखाली, तर काही भागांत शून्याखाली नोंदवले गेले आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये हिवाळ्याचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे.
महाराष्ट्रातील हवामान स्थिर, पण गारठा वाढतोय
राज्यात आज हवामान कोरडे ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पावसाचा धोका नाही.
विदर्भ व मराठवाडा : सकाळ-सायंकाळ हलकी थंडी जाणवेल. नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ या भागांत किमान तापमान १४-१७ अंश सेल्सियस दरम्यान राहील.
पुणे, नाशिक, अहमदनगर : सकाळी धुक्याचे वातावरण, हवेत गारवा. पुण्यात तापमान १५-१८ अंश सेल्सियस राहू शकते.
मुंबई व कोकण : दिवसा उबदार, परंतु रात्री समुद्री वाऱ्यामुळे हलका गारवा जाणवेल. मुंबईचे तापमान २०-३२ अंश सेल्सियस दरम्यान राहील.
कोल्हापूर, सातारा, सांगली : हवामान कोरडे आणि स्थिर, दिवस उबदार तर रात्री गारवा वाढलेला.
हवामान विभागानुसार, राज्यात पुढील काही दिवसांत थंडीचा जोर टप्प्याटप्प्याने वाढणार असून सकाळ-सायंकाळच्या वेळी गारवा अधिक जाणवेल.
'या' राज्यांमध्ये अजूनही पावसाचा अंदाज
देशभरात थंडी वाढत असली तरी तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि मेघालय या राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने जोरदार पाऊस आणि वाऱ्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टी भागांतील मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तापमानात झपाट्याने घट
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये तापमान स्थिर होते, परंतु आता पुन्हा घट नोंदवली जात आहे. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असून कुलाबा केंद्रात २३.५ अंश, तर सांताक्रूझ केंद्रात २१.२ अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवले गेले आहे.
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यभर थंडीचा प्रभाव वाढणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सध्याच्या हवामान स्थितीमुळे सकाळी धुके, गारवा आणि थंड वाऱ्यांचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर अनुकूल ठरू शकतो.
* मात्र, सकाळी जास्त धुके असल्यास पिकांवर बुरशीजन्य रोगाचा धोका राहतो, सल्ला देण्यात आला आहे.
