Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाची अनिश्चितता कायम आहे. काही भागांत मुसळधार पावसाचा तडाखा तर काही ठिकाणी तापमानातील चढ-उतार जाणवत आहेत. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (२० सप्टेंबर) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला असून काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
हवामानाची स्थिती काय?
उत्तर अंदमान समुद्रात म्यानमार किनाऱ्यालगत २२ सप्टेंबरपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्याच प्रभावामुळे २५ सप्टेंबरपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होऊन दक्षिण मध्य महाराष्ट्र ते उत्तर प्रदेशपर्यंत पसरू शकतो.
यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर चढ-उतार करत राहणार आहे.
पावसाची नोंद
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
धाराशिव (वाशी) येथे सर्वाधिक २२० मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाच्या पार्श्वभूमीवरही काही भागांत उष्णतेची लाट कायम आहे.
ब्रह्मपुरी (विदर्भ) येथे राज्यातील सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झाली.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
आज विजांसह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
मान्सूनचा परतीचा प्रवास
नैऋत्य मोसमी वारे १४ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून माघारी निघाले आहेत. सध्या भटिंडा–अजमेर–भूजपर्यंत परतीची सीमा स्थिर आहे. पुढील दोन दिवसांत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागांतून मान्सूनची माघार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* शेतात पाणी साचू देऊ नका, निचरा व्यवस्थित ठेवा.
* पिकांवर रोगनियंत्रक फवारणी करण्यापूर्वी हवामान स्थिर झाल्यानंतरच उपाययोजना करा.
* कापसातील बोंड अळी, सोयाबीनवरील पानावरील डाग व तुरीतील कीड यावर नियमित निरीक्षण ठेवा.
* वीजेच्या कडकडाटाच्या वेळी शेतात थांबू नका, सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.