Maharashtra Weather Update : मान्सून हंगाम संपत असताना राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. अरब समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यानं आणि 'मोंथा' चक्रीवादळाच्या प्रभावानं (Montha Cyclone Effect) सागरी वारे सक्रिय झाले असून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत नवा इशारा जारी केला असून, येत्या ४८ तासात राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
अतिदक्षतेचा इशारा
दक्षिण कोकण आणि गोवा परिसरात सागरी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी इतका राहणार आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात पावसाचा जोर वाढणार
विदर्भात पुढील २४ तासांत पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
रब्बी हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो, मात्र अतिवृष्टी झाल्यास नुकसानीची शक्यताही नाकारता येत नाही.
पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही सरींची शक्यता
सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, अधूनमधून वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरात बदलले हवामान
मुंबईत सोमवारी सायंकाळपासूनच वाऱ्यांचा वेग वाढलेला दिसून आला. पुढील २४ तासांतही हेच चित्र कायम राहणार असल्याचे आयएमडी (IMD) ने सांगितले आहे.
सागरी वाऱ्यांच्या दिशेमुळे शहरात ढगाळ वातावरण, दमट हवा आणि अधूनमधून कोसळधार अशी स्थिती राहणार आहे.
मासेमार आणि किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने काय दिला इशारा
* दक्षिण कोकण-गोवा किनारपट्टीवर अतिदक्षता
* विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
* पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात तुरळक सरी
* मुंबईसह किनारपट्टी भागांत बदलत्या हवामानाचा परिणाम
शेतकऱ्यांना सल्ला
* वीजांच्या कडकडाटात घराबाहेर जाणं टाळा.
* पिकांची आणि बियाण्यांची साठवण कोरड्या ठिकाणी करा.
* मासेमारांनी समुद्रात न जाण्याची दक्षता घ्यावी.
* शेतीकाम करताना हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवावे.
