Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची झोड दिसणार आहे. (Heavy Rain)
हवामान विभागाने (IMD) आज (२२ जुलै) रोजी सकाळी राज्यासाठी महत्त्वाची हवामान सूचना जाहीर केली. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काहींसाठी यलो अलर्ट देण्यात आले आहेत.(Heavy Rain)
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकणात पावसाचा जोर टिकून असून, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही भागांत अतिजोरदार पाऊस होऊ शकतो. नद्यांच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई-ठाण्यात वादळी वारे
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किमीपर्यंत जाऊ शकतो. मुंबई आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट, तर कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
झाडे कोसळणे, विजेच्या तारांचे नुकसान होणे यासारखी परिस्थिती उद्भवू शकते. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. काही भागांत ढगाळ वातावरण राहील, तर पुणे व साताऱ्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या आणि शेतीकाम करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यात तुरळक पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. पेरण्या आणि पिकांचे नियोजन करताना पावसाच्या स्थितीचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी सोमवारी रात्रीपासून बरसत आहेत.
विदर्भात पावसाचा जोर
विदर्भातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून, नागपूर, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ अशा जिल्ह्यांत पाऊस झोडपेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सतर्कतेचा इशारा
कोकण व मुंबईकरांसाठी सूचना : समुद्रकिनारी न जाणे, झाडांखाली उभे न राहणे आणि विजेच्या तारांपासून दूर राहणे.
आवश्यक वस्तू जवळ ठेवाव्यात आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
घाटमाथ्यावर व नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची पातळी लक्षात ठेवून सावधगिरी बाळगावी.
कुठे कोणता अलर्ट
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यलो अलर्ट : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर
शेतकऱ्यांना सल्ला
* मराठवाड्यात पाऊस तुरळक राहणार आहे, त्यामुळे उशिरा पेरण्या करताना कोरडवाहू पिकांचे (मुग, उडीद, बाजरी) वाण निवडा.
* पेरणी केलेल्या शेतात ओलावा टिकून राहील अशी मशागत करा.
* जमिनीत ताण जाणवू नये म्हणून आंतरमशागत करा.