Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जिल्हे अक्षरशः ओलेचिंब झाले आहेत. कालपासून राज्यात वेगवेगळ्या भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून, रस्ते पाण्याखाली गेले, तर काही गावांचा संपर्क तुटला. (Maharashtra Weather Update)
आज (१० जुलै) रोजीही राज्यात पावसाची हाजेरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, विदर्भ आणि घाट विभागांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बुधवारी (९ जुलै) रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. गावे वेढली गेली, रस्ते बंद झाले आणि काही ठिकाणी पुराच्या पाण्याने अडथळा निर्माण झाला.
घाट विभागात पावसाचा जोर
कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या घाट विभागांमध्येही कालपासून जोरदार पाऊस सुरू असून, आज काही भागांत पावसाचा जोर कायम राहील.
मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता
अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.
वर्धा जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे, जिथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम
बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. आजही काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात कसे राहणार हवामान?
पुणे व परिसरात आजपासून पुढील पाच दिवस आकाश बहुतांश वेळा ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कुठे कोणता अलर्ट
ऑरेंज अलर्ट: भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली
यलो अलर्ट: वर्धा
शेतकऱ्यांना सल्ला
* विजांचा कडकडाट सुरु असताना आकाशात वीज पडताना शेतात किंवा झाडाखाली थांबू नका.
* सोयाबीन, तूर, मूग, उडीद पेरले असल्यास, पाणी साचू देऊ नका.
* नद्या, नाल्यांच्या काठावर जाणे टाळा.
* डोंगराळ व पुरग्रस्त भागांत सतर्क राहा.
* शेती कामे शक्यतो पुढे ढकलावीत.