Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार सरींमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. (Maharashtra Weather Update)
विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच जोरदार सरी कोसळू लागल्या असून आज (१६ ऑगस्ट) सकाळपासूनही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबईत पावसाचा कहर
काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाला. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून रेल्वेसेवा व रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना पावसाचा वेग आणि कालावधी यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हवामान विभागाचा अलर्ट
मुंबई, ठाणे या भागात १६-१७ ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे
रायगड येथे १६ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर येथे १९ ऑगस्टपर्यंत पावसाची तीव्रता वाढणार असून सध्या येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी व रायगड येथे मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने (IMD) नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
पुढील काही दिवसांचा अंदाज
पुढील तीन दिवस राज्यात विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, पुणे, नाशिक आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. एकूणच राज्यात पावसाने दमदार पुनरागमन केलं असून पुढील काही दिवस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतात पाणी साचू देऊ नका
* पावसात फवारणी/तणनियंत्रण टाळा
* उंच पिकांना आधार द्या, असा सल्ला देण्यात आला आहे.