Maharashtra Weather Update : अरबी समुद्रातील चक्रीवादळ 'शक्ती' आता विरलं असलं, तरी त्याचा परिणाम अजूनही महाराष्ट्राच्या हवामानावर जाणवतोय. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावरून चक्रीवादळाचे सावट दूर झाले असले तरी अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पुढील २४ तासांमध्ये काही भागांवर पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट सुरू राहण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update)
पश्चिम महाराष्ट्रावर ढगांचं सावट
पुढील २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी आणि विजांच्या गडगडाटासह हवामान अस्थिर राहणार आहे. त्यामुळे या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर, रायगड, रत्नागिरी, नाशिकच्या घाटमाथ्यांसह पुणे, लातूर, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र लख्ख सूर्यप्रकाशासह तापमान वाढलेले दिसेल.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय
चक्रीवादळ 'शक्ती' माघारी गेलं असलं, तरी अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्राच्या पश्चिम व दक्षिण भागावर दिसतो आहे.
दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, तर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसतील.
या बदलत्या हवामानामुळे मध्येच ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाचा लपंडाव सुरू राहील. वाऱ्याच्या दिशेमध्ये होणाऱ्या वारंवार बदलांमुळे हवामानाचा नेम लावणं पुढील काही दिवस कठीण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात गारव्याची चाहूल
दरम्यान, उत्तर भारतात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिमालयातून येणाऱ्या शीत वायू लहरींमुळे उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीर या पर्वतीय राज्यांमध्ये तापमानात घट होत असून, केदारनाथ धामसह अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, या थंड लहरींचा परिणाम आता हळूहळू मध्य भारतापर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे?
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता अधिक आहे.
चक्रीवादळाचं सावट विरलं असले, तरी महाराष्ट्रात हवामान अजून स्थिर झालेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात अजूनही पावसाच्या सरी बरसतील, तर इतर भागांमध्ये पुन्हा लख्ख ऊन आणि तापमान वाढ जाणवेल. अशा बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पश्चिम महाराष्ट्रात पुढील २४ तासांमध्ये विजांचा कडकडाट व पावसाच्या सरींची शक्यता असल्याने शेतात उभ्या पिकांवर पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची खात्री करा.
* सोयाबीन, तूर, भात या पिकांच्या शेतात पाणी साचू देऊ नका, असा सल्ला देण्यात आला आहे.