Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा हवामानात अनिश्चितता वाढली आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.
राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी गारठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाळा, उन्हाळा आणि थंडी हे तिन्ही ऋतू एकत्र अनुभवायला मिळत आहेत.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पुढील २४ तासांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातही परिस्थिती वेगळी नाही. नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात ढगाळ वातावरण कायम असून काही ठिकाणी पहाटे गारठाही जाणवतोय. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या उष्णता, पाऊस आणि थंडी या तिन्ही ऋतूंचा संगम अनुभवायला मिळतोय.
कोकण आणि विदर्भात पुन्हा पावसाची हजेरी
मागील २४ तासांमध्ये कोकणातील काही भागांत आणि विदर्भात पावसानं हजेरी लावली. हीच परिस्थिती आज, ३१ ऑक्टोबर रोजी, कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकणात: दक्षिण कोकणातील किनारपट्टी भागांपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील.
विदर्भात: अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मोंथा चक्रीवादळाचा परिणाम
सध्या अरबी समुद्रात आणि मध्य भारत परिसरात सक्रिय असलेलं 'मोंथा' चक्रीवादळ आता कमकुवत होण्याच्या टप्प्यावर आहे. ही प्रणाली पूर्वेकडील विदर्भातून मध्य प्रदेशाकडे सरकत आहे. (Montha's Cyclone)
तज्ज्ञांच्या मते, या चक्रीवादळामुळेच महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस दिसून येतोय. पुढील तीन ते चार दिवसांत ही प्रणाली पूर्णपणे निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यभर तापमानवाढ होईल.
तीन ऋतूंचा संगम
पुढील २४ तासांमध्ये राज्यभर तापमानात वाढ होईल. तथापि, काही भागांमध्ये पहाटेच्या वेळी गारठा जाणवेल. यामुळे एकाच वेळी पावसाळा, उन्हाळा आणि थंडी या तिन्ही ऋतूंचा परिणाम राज्यात जाणवणार आहे.
देशभरातील हवामानाचा आढावा
देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. मात्र, उर्वरित भागात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिमालय परिसरातून येणाऱ्या शीतलहरींनी उत्तर भारतात जोर धरला आहे.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे थंडीचा कडाका वाढला आहे.
राजस्थानातही जैसलमेरसह वाळवंटी भागांत रात्रीचे तापमान खाली येत आहे.
डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीची सुरुवात होत असून, उत्तर भारतात हिवाळ्याने हजेरी लावली आहे.
राज्यात सध्या हवामानाचं चित्र अनिश्चित आहे. एका बाजूला वादळी पावसाचा इशारा, तर दुसऱ्या बाजूला तापमानवाढ आणि गारठ्याची चाहूल या तिन्हींच्या संगमात राज्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान अंदाजांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील २४ तासांमध्ये राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
* कापणी केलेला शेतमाल तसेच सोयाबीन खुल्या जागेत ठेवू नका.
* धान्य, गहू, मका, सोयाबीन इत्यादी सुकवलेले माल गोदामात किंवा शेडमध्ये साठवून ठेवा.
