लाभक्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणात बोरी व हरणा नदीद्वारे प्रचंड पाणी येत आहे.
धरण ओव्हरफ्लो झाल्याने संबंधित विभागाने पाच दरवाजे उघडून धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, बंधारेही भरले आहेत. प्रशासन याबाबत खबरदारी घेत आहे.
मागील आठवड्यापासून दिवसा व रात्री पावसाची संततधार आहे. मराठवाड्यात पडत असलेल्या संततधारमुळे कुरनूर धरणात बोरी व हरणा नदीद्वारे पाणी मिसळत आहे.
यामुळे संबंधित प्रशासनाने मंगळवारी पहाटे पाच दरवाजे उघडले. याद्वारे जवळपास २००० क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी धरणाखालील बोरी नदीतही प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे.
बोरी नदीवरील सर्वच बंधारे काटोकाठ भरले आहेत. याबाबत अक्कलकोट तालुका प्रशासन सतर्क झाले असून, नदी आणि बंधारे जवळची गावे आणि लोकवस्तींना सतर्क करीत आहेत.
निमगाव, बोरीउमरगे पुलावरून पाणी
निमगाव व बोरीउमरगे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही गावांचा संपर्क तुटत आहे. पावसाचे परिस्थिती अशीच कायम राहिल्यास याहीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या जनतेने खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नदीकाठच्या जनतेने सतर्कता बाळगावी
कुरनूर धरण ओव्हरप्लो झाल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. परंतु, नदीकडेच्या गावातील जनतेनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: पाणंद शेतरस्ते आता कायमस्वरूपी रेकॉर्डवर येणार; भुमी अभिलेख विभागाने घेतला 'हा' निर्णय?