राजाराम लोंढे
यंदा मान्सूनपूर्व पावसाने झोडपलेच त्याचबरोबर मान्सूनने जोरदार एंट्री केल्याने गेल्या २४ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
पावसाचा जोर पाहता २०२१ ची आठवण कोल्हापूरकरांना येत असून, त्यावेळी ३५० मिलीमीटर पाऊस झाला होता. मात्र, धरणातीलपाणीसाठा आतापेक्षा निम्मा होता. त्यामुळे यंदा २०२१ पेक्षाही अधिक महापुराची धास्ती कोल्हापूरकरांना राहणार आहे.
जून महिन्याची सरासरी २९० मिलीमीटर आहे. महिना संपायला अजून सहा दिवस आहेत, तोपर्यंत जूनची सरासरी ओलांडून पुढे गेली आहे. मागील तीन वर्षांपेक्षा तिप्पट पाऊस आहे २०२१ मध्ये असाच पाऊस होता. त्यात धरणातील साठा त्यापेक्षा दुप्पट असल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात गोळा आला आहे.
प्रमुख धरणातील २४ जून अखेरचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरण | २०२१ | २०२५ |
राधानगरी | ३.१५ | ५.२५ |
वारणा | १८.१६ | २०.३४ |
दूधगंगा | ९.८१ | ८.१५ |
कासारी | १.०५ | १.१८ |
कडवी | १.१२ | १.४४ |
कुंभी | १.३६ | १.५७ |
पाटगाव | १.७८ | २.३३ |
घटप्रभा | १.५२ | १.५६ |
गेल्या पाच वर्षांतील २४ जूनपर्यंतचा पाऊस, मि.मी. मध्ये
वर्ष | सरासरी पाऊस | पंचगंगेची पातळी फुटात |
२०२१ | ३५०.० | १७.३ |
२०२२ | ८१.७ | ८.०५ |
२०२३ | १५.८ | ८.१९ |
२०२४ | १४१.० | १३.५ |
२०२५ | ३०१.२ | २९.८ |
पाटबंधारे विभागाची कसोटी
जूनमधील धरणातील पाणीसाठा, आगामी तीन महिने पडणारा संभाव्य पाऊस याचा ताळमेळ घालून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाने आतापासूनच विसर्ग सुरू केला असला, तरी काळ कसोटीचा असेल.
यावर्षी बालिंगे पुलाशेजारी टाकलेल्या भरावामुळे आरे परिसराला महापुराचा धोका अधिक आहे. त्यात, जूनपासूनच पावसाने सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी धसका घेतला आहे. - पी. डी. पाटील, ग्रामस्थ, आरे.
जून महिन्यातच पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे, सध्याचा पाऊस बघता जादा धोक्याची शक्यता आहे. प्रयाग चिखली ग्रामस्थांना सोनतळी येथे प्लॉट दिले असले तरी कुटुंबांचे विभाजन झाले आहे. त्यामुळे ४०० कुटुंबांना प्लॉटची गरज आहे. - विठ्ठल कळके, सदस्य, ग्रा. पं. चिखली.
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप