अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दिलासा दिला. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे. पण पावसाळ्यात मागील दोन महिन्यांत इतर मध्यम आणि लघु प्रकल्पांत जेमतम जलसाठा असल्याने मराठवाड्याची चिंता वाढली आहे.
जायकवाडीच्या उर्ध्वभागात असाच पाऊस सुरू राहिल्यास पुढील ८ते १० दिवसांत जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल. दुसरीकडे मात्र मराठवाड्यातील अन्य प्रकल्पांची अवस्था दयनीय आहे. मराठवाड्यात ७५ मध्यम प्रकारची धरणे आहेत.
या धरणांत आज सरासरी केवळ ३५ टक्के जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ धरणांत १९ टक्के तर जालना जिल्ह्यातील ८ प्रकल्पांत १८ टक्के पाणी आहे, बीडमध्ये १७ मध्यम प्रकल्प असून, यात ५४ टक्के जलसाठा आहे.
लातूरमधील ८ प्रकल्पांत १७ टक्के, तर धाराशिव जिल्ह्यातील १७ धरणांत ४३ टक्के आणि नांदेड जिल्ह्यातील ९ धरणांत ४२टक्के पाणी आहे. परभणी जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प असून, यात २९ टक्के पाणीसाठा आहेत.
गतवर्षीपेक्षा सध्या मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली आहे. गतवर्षी या दिवशी १७ टक्के पाणीसाठा होता. २०२३ मध्ये २४ टक्केच जलसाठा होता. मध्यम प्रकल्पाप्रमाणेच मराठवाड्यातील लघु प्रकल्पांतील जलसाठेही समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.
आजची जलस्थिती गतवर्षीपेक्षा बरी; पण पाऊस हवाच
जिल्ह्याचे नाव | लघु प्रकल्प | २०२५ | २०२४ | २०२३ |
छ. संभाजीनगर | ९८ | १४% | ८ | ८ |
जालना | ५७ | १७% | १ | २ |
बीड | १२६ | ३३% | ११ | ७ |
लातूर | १३५ | २१% | १८ | १८ |
धाराशिव | २०६ | ४०% | २४ | ६ |
नांदेड | ८० | ३७% | ३१ | ७७ |
परभणी | २२ | १८% | १५ | १० |
हिंगोली | २७ | ०२% | २१ | ५९ |
७५१ लघु प्रकल्पांचे चित्र अधिक भीषण; हिंगोलीत लघु प्रकल्पांत २ टक्के पाणी
मराठवाड्यातील ७५१ लघु प्रकल्पांच्या जलस्थितीचे चित्र अधिक भीषण आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधील लघु प्रकल्पांत केवळ १४ टक्के, तर जालन्यात १७ टक्के आणि हिंगोलीतील लघु प्रकल्पांत केवळ २ टक्के पाणीसाठा आहे.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी