कोल्हापूर : जून महिना निम्मा झाला अजून साडेतीन महिने पाऊस आहे, तोपर्यंतच जिल्ह्यातील पाच धरणे निम्याहून अधिक भरली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पट पाणीसाठा आहे. त्यात पावसाचा दणका पाहता यंदा नदीकाठच्या शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पोटात जून महिन्यातच गोळा आला आहे.
पावसाळा आला की कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ होते. त्यात यंदा, वळीव पावसाने सगळीकडेच झोडपून काढले आहे. ऐन उन्हाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले होते.
जूनमध्ये थोडी उघडीप दिली असली तरी गेल्या चार-पाच दिवसापासून जोरदार कोसळत आहे. धरण क्षेत्रात ही पाऊस सुरु असल्याने पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
'राधानगरी' सह पाच धरणे निम्मी भरली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणात दुप्पट पाणी आहे. राधानगरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आगामी काळात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. असाच पाऊस राहिला तर यंदा जुलै महिन्यातच धरणे पूर्ण क्षमतेने भरतील.
तेथून पुढे दोन महिने पाणी सोडायचे कोठे? असा पेच पाटबंधारे विभागासमोर राहणार आहे. नदीकाठावरील नागरिकांमध्ये आतापासूनच पुराची धास्ती वाटू लागली आहे.
आतापासूनच विसर्गाचे नियोजन
पाटबंधारे विभागाने आतापासूनच पाणी विसर्गाचे नियोजन केले असून जी धरणे निम्याहून अधिक भरली आहेत. त्यातून आतापासूनच विसर्गाचे नियोजन केले आहे.
धरणांचा पाणीसाठा
धरण - १६ जून २०२४ (१६ जून २०२५) - टक्केवारी
राधानगरी - २.०० (४.५७) - ५४%
तुळशी - १.२७ (१.८२) - ५२%
वारणा - १०.३० (१४.५२) - ४२%
दूधगंगा - ३.७० (५.८३) - २२%
कासारी - ०.८१ (०.९४) - ३३%
कडवी - १.१६ (१.१०) - ४३%
कुंभी - १.०० (१.४०) - ५०%
पाटगाव - १.२८ (१.८६) - ४९%
चिकोत्रा - ०.५० (०.७७) - ५०%
चित्री - ०.४७ (०.६३) - ३३%
घटप्रभा - ०.६४ (१.३६) - ८६%
अधिक वाचा: दोन्ही समुद्रात तयार झाली चक्रीय स्थिती; राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता