नातेपुते : नीरा खोऱ्यातील वीर धरण आणि भाटघर, नीरा देवधर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढला आहे.
सध्या वीर धरण ९५ टक्के, तर भाटघर धरण ९६ तर, नीरा देवधर ८७.५६ टक्के, गुंजवणी ७५ टक्के भरले आहे. पाणीसाठा वेगाने वाढू लागल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणांच्या सांडव्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. वीर धरणातून सुमारे २३ हजार ७३५ क्युसेक आणि भाटघर धरणातून ५,६३१ क्युसेक तर नीरा देवधरमधून ४,१३० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
पाण्याचा सतत वाढता विसर्ग लक्षात घेता नीरा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी नदीच्या पात्रात कुठेही जाऊ नये, जनावरे नदीकाठी नेऊ नयेत, पुराच्या संभाव्य धोक्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरणसाठा व विसर्ग
भाटघर धरण
या धरणात २६ टक्के पाणीसाठा आहे. सकाळी १० वाजल्यापासून अस्वयंचलित द्वारांतून ४,००० क्युसेक आणि विद्युत निर्मिती केंद्रातून १,६३१ क्युसेक्स, असा एकूण ५,६३१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
नीरा देवधर धरण
८७ टक्के पाणीसाठ्यासह, रात्री ७ वाजल्यापासून ४,१३० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
गुंजवणी धरण
७५.५२ टक्के पाणीसाठ्यासह, रात्री ७ वाजल्यापासून १८३० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
वीर धरण
२५.३२ टक्के पाणीसाठ्यासह, रात्री ७ वाजल्यापासून २३७३५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
प्रसंगी मदतीसाठी तत्पर राहावे
जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग दोन्हीही विभागांनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले आहे. दर तासाला परिस्थितीत बदल झाल्यास, किंवा पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच भर द्यावा. प्रसंगी मदतीसाठी तत्पर राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही