मुंबई : भारतीय हवामान खात्याने सोमवारी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे?
राज्यातील विविध भागांत २० ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.कुठे कसा पाऊस?◼️ विदर्भ, खानदेशच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक असेल.◼️ कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता आहे.◼️ हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.◼️ दुपारी चार नंतर बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे.◼️ वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीमुळे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी सूचना◼️ विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विज चमकताना दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.◼️ झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.◼️ मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.◼️ निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.
विशेष सूचना◼️ शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे.◼️ तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.◼️ राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज?