गोंदिया जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्यापाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे.
पाऊस थांबला असला तरी पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्या ९५ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणाचे ३ दरवाजे बुधवारी (दि.३०) ०.६ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून ७७५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता.
शिरपूरबांध धरणाचे ५ दरवाजे ०.३ मीटरने उघडण्यात आले असून त्यातून ३७५५.११४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता, मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि कालीसरार धरणाचे दरवाजे बुधवारी सायंकाळी बंद करण्यात आले.
पुजारीटोला आणि शिरपूरबंध धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने बाघ नदीसह परिसरातील नाले दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या ९५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ९७.५५ टक्केवर भरले असून हा प्रकल्प केव्हाही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.
विशेष मागील तीन वर्षापासून इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो होत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर गोंदिया जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा या धरणाची सिंचनासाठी महत्त्वपूर्ण मदत होत असते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा याकडे लागलेल्या असतात.
जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा
इटियाडोह : २७.५५ टक्के
शिरपूरबांध : ७०.७७ टक्के
कालीसरार : ६६.५६ टक्के
पुजारीटोला : ६५:५४ टक्के
रोवणीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
• जिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यालगतची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली होती. अनेक शेतकऱ्यांनी पाच सहा दिवसांपूर्वी रोवणी केली होती.
• मात्र या परिसरात तीन चार दिवस पाणी भरुन राहिल्याने काही शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेली तर काहींची सडली तर काही शेतकऱ्यांचे धानाचे पन्हे सुद्धा सडल्याने त्यांच्यावर रोवणीसाठी पन्हें आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नुकसानीचे पंचनामे सुरू
• गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आमगाव, सालेकसा, गोंदिया, देवरी तालुक्यातील रोवणी व पन्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
• काही शेतक-यांवर हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू आहे.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी