शिराळा तालुक्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व चरण परिसरात अतिवृष्टी झाली असून, त्यामुळे धरणातीलपाणीसाठ्यात मोठी भर पडली आहे.
दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता चांदोली धरणातील वक्राकार दरवाज्यातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे हा विसर्ग दि. १५ रोजी दुपारी ४ वाजता वाढवण्यात आला आहे.
सध्या ६,७३५ क्युसेकने आवक तर ८,५३० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीच्यापाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
महत्त्वाच्या पावसाच्या नोंदी (मिमी मध्ये)
पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद
पाथरपुंज : १६७ मिमी (एकूण: ३१३९)
निवळे : १४ मिमी (२८७१)
धनगरवाडा : ३५ मिमी (१६८१)
चांदोली : ७७ मिमी (१६७६)
तालुक्यातील धरणांची व तलावांची स्थिती
चांदोलीसह वाकुर्डे बुद्रूक येथील करमजाई तलाव, अंत्री बुद्रूक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे, शिवणी तलाव तसेच सर्व ४९ पाझर तलाव पूर्णपणे भरले आहेत. या वर्षी चांदोली धरणात २८.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
शेतीच्या कामात पुन्हा अडथळा, शेतकरी चिंतेत
गेल्या काही दिवसांत उघडीप मिळाल्याने शेतकरी भातलावणी, पेरणी व फवारणीच्या कामांत व्यस्त होता. मात्र पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. काही भागांत अद्याप पेरणीच झाली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आता नदीचे पाणी पात्राबाहेर पडले तरी खोळंबा होणार आहे.
धरणात ६७३५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून ८ हजार ५५० क्युसेक जल विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे वारणा धरण व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. - सुदाम कुंभार, शाखाधिकारी, वारणा धरण व्यवस्थापन वारणावती
अधिक वाचा: शासनाने तुकडेबंदीचा कायदा शिथिल केला; आता ४-५ गुंठे जमीन खरेदी करता येईल का?