कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणात रविवारी एकूण क्षमतेच्या म्हणजे ५१९.६० मीटरपैकी ५१८.१६ मीटरपर्यंत पाणी पातळी गेली आहे. धरणाचे सर्व २६ दरवाजे खुले झाले आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सध्या धरणात १ लाख ९३७ क्सुसेक पाण्याची आवक आहे. ९० हजार ७४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणाचा पाणीसाठा १०० टीएमसीवर गेला आहे. धरण ८१.२७ टक्के भरले आहे. यंदा मे महिन्यापासून जोरदार पाऊस कोसळत आहे.
यामुळे महाराष्टातून पाणी अलमट्टीच्या धरणात मोठ्या प्रमाणात जात राहिले. धरणात पाणी साठा केल्याने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होते.
यामुळे महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाने वेळोवेळी पाठपुरावा करून पाण्याचा विसर्ग वाढवण्यास भाग पाडले. तरीही धरणात एक लाख क्युसेकवर पाण्याची सध्या आवक होत आहे. आवक वाढत राहिल्याने विसर्गही वाढला आहे.
धरण पूर्ण भरत आल्याने सर्व २६ दरवाजे खुले केले आहेत. अजून सप्टेंबपर्यंत पावसाचे दिवस आहेत. ऑगस्ट अखेर पूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे.
गगनबावडा, चंदगड, शाहूवाडीत जोरदार पाऊस◼️ जिल्ह्यात उद्या, मंगळवार पासून पावसाला पुन्हा दमदार सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूर शहरात रविवारी अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी गगनबावडा चंदगड, शाहूवाडी तालुक्यात पाऊस सुरू आहे.◼️ रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ११.३ मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे. रविवारी दिवसभरात पंचगंगा नदी पातळी दोन इंचाने कमी झाली आहे.
अधिक वाचा: ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास मुदतवाढ; यंदा किती कोटींची तरतूद? वाचा सविस्तर