पश्चिम विदर्भात काही शहरात पुन्हा उष्ण लाटांची स्थिती निर्माण झाली आहे. अकोल्याचा पारा पुन्हा ४५ अंशांवर गेला असून ते पुन्हा राज्यात सर्वात उष्ण शहर ठरले आहे. अमरावती शहराचे तापमानही ४४ अंशांवर पोहोचले आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर तापले असून पारा ४४.२ अंशांवर पोहोचला आहे.
हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पावसाच्या स्थितीचा अंदाज व्यक्त केला असला तरी येथे मिश्र स्वरूपाचे वातावरण दिसून येत आहे. काही शहरात उष्ण लाटांचे चटके बसत आहेत. अकोला शहरात अवकाळीच्या ढगांचा कुठलाही दिलासा मिळाला नाही. चंद्रपूर प्रमाणेच अकोला शहराची उष्ण शहरांकडे वाटचाल होताना दिसत आहे.
मंगळवारी ४४.६ अंशांवर असलेला पारा बुधवारी ४५ अंशांवर उसळला. अमरावती एका अंशाने वाढून ४४ वर पोहोचले. चंद्ररात तापमानात चढउतार होत ४४.२ अंशांची नोंद झाली. मंगळवारी ४३ अंशांवर गेलेला नागपूरचा पारा बुधवारी ४१.६ अंशांवर खाली आला. वर्धा ४३.२ अंश, ब्रह्मपुरी ४२.९ अंश, वाशिम ४२.४, तर यवतमाळ ४१.६ अंशांवर आहेत.