टेंभुर्णी : उजनी धरणाचीपाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता भीमा नदीत ७० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
शिवाय वीर धरणातून नीरा नदीत ३२ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जवळपास १ लाख क्युसेक विसर्ग असल्याने भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी धरणातून सकाळी ९ वाजता ६० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २५ हजार ६९६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, बंडगार्डन येथे २८ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
तर घोड धरणातून १० हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असल्याने दौंड येथून भीमा नदीत उजनी धरणात ५२ हजार ४०० क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग मिसळत आहे.
यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे. उजनी व वीर धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नृसिंहपूर येथे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सायंकाळी ६ वाजता याठिकाणी ८० हजार क्युसेक विसर्ग होता तर पंढरपूर येथे ४७ हजार १७९ क्युसेक विसर्ग असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत पंढरपूर येथे १ लाखापर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन
◼️ सध्या उजनी धरणाची पाणी पातळी ९७.९० टक्केपर्यंत गेली असून, धरणात एकूण ११६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ५२.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
◼️ उजनी १०० टक्के भरण्यासाठी आणखी १ टीएमसी पाण्याची गरज असली, तरी उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाणी कमी-जास्त करण्यात येत असल्याचे उजनी धरण व्यवस्थापनाने कळवले आहे.
◼️ भीमा नदीतील वाढता विसर्ग पाहता, सतर्कतेचा इशारा पूर व्यवस्थापनाने दिला आहे. वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ६०० असा एकूण ७१ हजार ६०० क्युसेक विसर्ग उजनी धरणाच्या १६ दरवाजांतून सोडण्यात येत आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांचे बांधावरील वाद आता निकाली निघणार; सातबाऱ्यावरील पोटहिश्श्यासाठी 'हा' महत्वाचा निर्णय