जायकवाडी धरण परिसर व नाशिक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणाचे १८ दरवाजे दीड फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात ३७ हजार ७२८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
सध्या धरणाची पाणी पातळी १५२१.८८ फुटावर पोहोचली असून, जिवंत पाणीसाठा २१५६.६०६ दलघमी आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९३.९१ टक्के होता. यावर्षी जायकवाडी धरणात ९२ टीएमसी पाणी आले असून, धरणाचे दरवाजे उघडून ३२ टीएमसी पाणी आजपर्यंत गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे.
दरम्यान दरवाजे उघडल्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये संभाव्य पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. धरणातून विसर्ग नियंत्रित पद्धतीने सुरू असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे.