अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-रतनवाडी-हरिश्चंद्रगड-कुमशेत-साम्रद भागात संततधार पाऊस सुरू असून दोन्ही धरणात पाण्याची प्रचंड आवक सुरू आहे.
सातत्याने पाण्याची आवक होत असल्याने सायंकाळी निळवंडे धरणातून १२ हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी दिली.
निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून १२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून ९ हजार ७७४ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
या विसर्गात वाढ झाली तर निळवंडेतून अधिक क्युसेकने पाणी लाभक्षेत्राकडे झेपावते. निळवंडे धरण भिंती जवळचे कोकणेवाडी येथील सबमर्सिबल पूल, निंब्रळ सावंतवाडी दरम्यानचा पूल तसेच अकोले शहर आगार येथील अगस्ती पूल पाण्याखाली गेला असून प्रवरा नदीला पूर आला आहे.
अकोले नगरपंचायतने फलक व बांबू लावून अगस्ती पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
देवठाण येथील आढळा धरणाचा १,०९५ क्युसेक विसर्ग असून अवर्षणप्रवण क्षेत्रातील आढळा नदी दुवडी भरून वाहते आहे. ओझर उन्नेय बंधाऱ्यातून ३,८८३ क्युसेकने प्रवरा नदीतून विसर्ग सुरू आहे.
पुढील काही तासांत विसर्ग टप्याटप्याने पाणी वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दोन्ही धरण पाणलोट क्षेत्रात रविवारी रतनवाडी १८१, घाटघर १७७ पांजरे १४३, भंडारदरा-शेंडी १०५, वाकी ९८, निळवंडे ४८ व अकोल्यात ४१ मिलीमीटर असा विक्रमी पाऊस झाला.
सोमवारी दिवसभर धरण पाणलोटात व शहर परिसरासह तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरु होता. या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीची सर्व कामे, भात आवण्या ठप्प आहेत.
१८१ मिलीमीटर असा विक्रमी पाऊस रतनवाडी येथे झाला. तर घाटघर १७७ पांजरे १४३, भंडारदरा-शेंडी १०५, वाकी ९८, निळवंडे ४८ व अकोल्यात ४१ मिलीमीटर असा पाऊस झाला.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अकोले, संगमनेर, ओझर बंधाऱ्याखालील गावांसह राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना व वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील जनावरे व इतर साहित्य तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून धरणातील विसर्गात बदल होगा रातो प्रत्यासनाशी संपर्कात राहून दक्षता बाळगावी. नागरिकांनी नदीपात्रात उतरणे अथवा उशिरा हालचाल टाळावी तसेच संबंधित तालुक्यांतील प्रशासकीय यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. - प्रदीप हापसे, कार्यकारी अभियंता, उर्ध्व प्रवरा धरण विभाग, संगमनेर
अधिक वाचा: 'एफआरपी'चे ४४० कोटी अडकले; साखर किंवा मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट द्या