मेहरून नाकाडे
रत्नागिरी: शेती करणे अवघड नाही. परंतु वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे मात्र अवघड आहे. त्यावर पर्याय म्हणून आरवली (ता. संगमेश्वर) येथील केदार संजय केळकर यांनी 'लिली'च्या फूलशेतीचा पर्याय निवडला आहे.
केदार स्वतः विद्युत व्यावसायिक आहेत. ते एकदा शेतकरी मित्राबरोबर झेंडूची रोपे खरेदीसाठी कोल्हापूरला गेले होते. निव्वळ हौस म्हणून झेंडूची त्यांनी २०० रोपे आणून लागवड केली. तेव्हाच खऱ्या अर्थाने केदार यांचा शेती क्षेत्रात प्रवेश झाला.
पहिल्या वर्षी केदार यांना झेंडू लागवडीतून चांगला फायदा झाला. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या वर्षी स्वतः रोपे तयार करून लागवड केली. झेंडू लागवडीत फायदा असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेती वाढविण्याचा निर्णय घेतला.
परंतु एका वर्षी वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस केल्यामुळे झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावर केदार यांनी यावर पर्याय म्हणून 'लिली'ची शेती करण्याचा निर्णय घेतला.
सन २०१८ मध्ये त्यांनी केवळ १३ लिलीचे कंद लावले. आता त्यांच्या शेतात सहा हजार लिलीच्या कंदाची लागवड केली आहे. अतिवृष्टी, कमी पर्जन्यमान मोकाट जनावरे, वन्य प्राण्यांचा कोणताही त्रास नाही.
त्यामुळे हे पीक फायदेशीर असल्याने केदार यांनी लिलीची लागवड वाढविली आहे. केदार यांनी जमिनीच्या एकूण नऊ वेगवेगळ्या क्षेत्रात लिलीची लागवड केली आहे.
दररोज ४० ते ५० बंडल लिलीची फुले काढून ते बाजारात विकतात. संगमेश्वर, आरवलीतच त्यांच्या शेतातील फुलांची विक्री होत असून फूल व्यावसायिक स्वतःहून केदार यांच्याकडे संपर्क साधतात.
नऊ इंचाच्या ३६ कळ्यांचे बंडल बांधून विक्री केली जाते. दररोज सायंकाळी कळ्या तोडून त्यांची बंडले बांधून सकाळी विक्रीला पाठविली जात असल्याचे केदार यांनी सांगितले.
मित्रामुळे शेतीची आवड
◼️ मित्राची शेती आहे. त्याच्याबरोबर झेंडूची रोपे आणण्यासाठी गेलेल्या केदार यांना मित्राने काही रोपे विकत घेण्याचा सल्ला दिला.
◼️ हौस म्हणून रोपे विकत घेतली. पहिल्याच वर्षी चांगला फायदा झाल्याने उत्सुकता वाढली व शेतीकडे वळल्याचे केदार यांनी सांगितले.
◼️ झेंडू पिकाचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाले मात्र न डगमगता पर्याय शोधला, तो यशस्वी झाल्यामुळे लिली लागवड वाढवली. लिलीच्या शेतीत त्यांचा आता चांगलाच जम बसला आहे.
सेंद्रिय शेतीवर भर
◼️ पालापाचोळा, शेणखत एकत्रित करून केदार सेंद्रिय खत तयार करतात व त्यापासून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताचाच वापर ते लिलीच्या शेतीसाठी करत आहेत. कोणत्याही प्रकारची रासायनिक खते वापरत नाहीत.
◼️ पाण्याचा योग्य व पुरेसा वापर करण्यासाठी ठिबक सिंचन सुविधा शेतात बसवण्यात आली आहे. त्याचा त्यांना चांगला फायदा होत आहे.
◼️ लिलीशिवाय काही क्षेत्रावर काजू, भात व भाजीपाला पिके ते घेत आहेत. मात्र 'लिली' शेतीवरच त्यांचा सर्वाधिक भर आहे.
◼️ या शेतीसाठी खर्च जास्त नाही, शिवाय मोकाट गुरे, वन्यप्राण्यांपासून त्रास होत नसल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने लिलीची शेती वाढवत नेली असल्याचे केदार केळकर यांनी सांगितले.
अधिक वाचा: आता पीएम किसानचा हप्ता मिळणार फक्त शेतकऱ्याच्या पत्नीला; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर