मेहरून नाकाडे
रत्नागिरी : रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले.
शेणखत, जीवामृत, सूक्ष्म कल्चर याचा वापर करून त्यांनी शंभर टक्के सेंद्रीय उत्पादनावर भर दिला आहे. प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी त्यांना ६-७ वर्षे वाट पाहावी लागली. परंतु घेतलेल्या श्रमाचे चीज झाले आहे.
वास्तविक धनंजय यांना त्यांच्या वडिलांमुळे शेतीची आवड निर्माण झाली. ६० ते ६५ वर्षे त्यांच्या वडिलांनी शेती केली. हरित क्रांतीमुळे ते पारंपरिकतेकडून रासायनिक शेतीकडे वळले होते.
मात्र रासायनिक खतांच्या वापराचे दुष्परिणाम लक्षात येताच धनंजय यांनी खतांचा वापर थांबविला. सेंद्रीय शेती पद्धतीचा अभ्यास केला.
त्यानुसार त्यांनी आंबा, काजू फळबाग असो वा भात, भाजीपाला शेती त्यासाठी शेणखत, गांडूळखत, जीवामृत, वेंगुर्ला येथील अजित परब यांनी विकसित केलेले अति उच्च दर्जाचे सूक्ष्म कल्चर याचा वापर करणे सुरु केले.
रासायनिक खतांची झाडांना शेतीला सवय असल्याने प्रत्यक्ष बदल होण्यास ६/७ वर्ष प्रतीक्षा करावी लागली. मात्र नंतर त्यांना चांगला बदल जाणवला. जमिनीचे आरोग्य सुधारल्याने, झाडांची वाढही चांगली झाली.
परिणामी शेतमालाची उत्पादकता, दर्जा, चव यामध्येही सकारात्मक बदल झाले असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय बारमाही शेती करतात.
पावसाळी भात, फळभाज्या, रबीमध्ये कुळीथ, पावटा, पालेभाज्या, वांगी, मिरची, भेंडी, वाली, गवार त्यानंतर बागायतीमध्ये आंबा, काजू उत्पादन घेतात. आता ते संपूर्ण सेंद्रीय शेती करत आहेत.
आंब्याची ते खासगी विक्री करत असल्यामुळे ग्राहकांकडून थेट मागणी होत आहे. चव व दर्जा यामुळे ग्राहक स्वतःहून संपर्क साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंद्रिय उत्पादनांना मागणी
शेतातील पालापाचोळा एकत्र करून त्यामध्ये शेणखत मिसळून कंपोस्ट खताचा वापर, जीवामृत, सूक्ष्म कल्चरचा वापर शेतीसाठी करत असल्यामुळे शेतमाल उत्पादनामध्ये सकारात्मक बदल झाले. उत्पादित शेतमालाचा दर्जा सुधारला परिणामी ग्राहकांकडून सेंद्रीय उत्पादनासाठी मागणी वाढली आहे.
बारमाही शेतीतून उत्पन्न
हवामानानुसार प्रत्येक पिकाचा हंगाम निश्वित असतो. त्याप्रमाणेच पिकांची लागवड धनंजय करत आहेत. खरीप, रब्बी, उन्हाळी पिकांसाठी योग्य अभ्यास व नियोजन करून लागवड करीत आहेत. त्यांच्याकडील उत्पादित पिकाचा दर्जा, चव, गुणवत्ता यामुळे ग्राहक स्वतः संपर्क साधून खरेदी करत आहेत. सेंद्रीय पद्धतीमुळे उत्पादकता वाढली आहे.
जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे
कोणत्याही पिकासाठी जमिनीचे आरोग्य महत्वपूर्ण आहे. जमीन निरोगी राहण्यासाठी उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश या घटकांची उपलब्धता होणे गरजेचे आहे. मात्र या घटकाची पूर्तता कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास धनंजय यांनी केला. त्याप्रमाणे त्यांनी पिकांना आवश्यक सेंद्रीय खतांची मात्रा दिली. ते सतत पिकाचे निरीक्षण करून त्याप्रमाणे उपाययोजना करतात.
अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल