देशात सर्वात जास्त धरणे असणाऱ्या आपल्या राज्यात सर्व कडे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे, ही परिस्थिती सर्व कडे आहे, विहीरी, बोरवेल, लहान धरणांनी कधीच तळ गाठला आहे. मोठ्या धरणांमध्येही साठा दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. उजनी सारख्या मोठ्या धरणात साठा अतिशय कमी आहे.
तापमान रोज वाढत आहे, बाष्पीभवन वेगाने होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी रोज अजुन खोल जात आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पशु, पक्षी ही हवालदील झाले आहे हे बघुन खुप वाईट वाटते. आपलं राज्य देशात प्रगत राज्य म्हटले जाते. दूरगामी विचार आणि उपाय केले पाहीजे, शोधले पाहीजेत असे वाटते.
पाण्याचा सर्वात जास्त वापर शेती व्यवसाय मध्ये होतो. शेतकऱ्यांनी पाण्याचे गांभीर्य समजुन पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची गरज आहे. जमिनीला पाणी देण्याऐवजी पिकांना पाणी द्यायला शिकले पाहीजे ह्या करीता ठिबक आणि तुषार सिंचनाचा अवलंब केला पाहीजे.
पाण्याचा वापर करणारे घरगुती साठी वापर असो की कारखानदारी, उद्योगधंद्यासाठी असो पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहीजे. हे एकट्याचे काम नाही तर सामुहीक काम आहे. पाण्याच्या भीषण टंचाईतून बोध घ्यावा.
पाणी टंचाईची प्रमुख कारणे
> दरवर्षी पुरेसा, समाधान कारक पाऊस न पडणे.
> सर्वच बाबतीत, ठिकाणी पाणी वापराबाबत गांभीर्य नसणे.
> पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत न जिरविणे, मुरविणे.
> पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाऊ देणे.
> बदलती जीवन शैली, गरज नसतांनाही पाण्याचा अपव्यय करणे. पाणी वाया घालविणे.
> सांडपाण्यावर प्रक्रिया न करणे, त्याचा पुनर्वापर न करणे.
> शेती व्यवसायमध्ये पाण्याचा सर्वात जास्त वापर होतो, मोकाट सिंचन पद्धतीचा सर्रास वापर होणे.
> धरणे, तलाव, शेततळे ह्यातील पाणी वापराबाबत लोकांमध्ये जागरुकता नसणे.
> भुगर्भातील पाण्याचा वारेमाप, प्रचंड उपसा करणे.
> हवामानातील बदल, दुष्काळी परिस्थिती पाण्याची टंचाई निर्माण करते.
> पाणी व्यवस्थापनातील उणीवा.
> लोकसंख्येत होणारी वाढ आणि पाण्याची वाढती मागणी.
> भुगर्भातील पाणी साठ्यांचे पुनर्भरण न करणे.
> पाण्याचा ताळेबंद, हिशेब न ठेवता पाण्याचा अति वापर करणे.
पाणी टंचाईवरील उपाय
> पाणी वापराबाबत जलसाक्षरतेचा प्रसार करणे.
> पडणाऱ्या पावसाचे संग्रहण करणे.
> जमीन आणि पाणी संधारणाची कामे हाती घेणे.
> शेती व्यवसाय मध्ये पाण्याचा अपव्यय टळावा व पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर व्हावा ह्याकरीता शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढवावा.
> शेतीमध्ये पिकाना पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे ह्या करीता विड मॅट किंवा मल्चींग फिल्मचा वापर करावा.
> शेततळे, तलाव, धरणे ह्यातील बाष्पीभवन कमी करण्याकरीता उपाय योजावेत.
> सर्व धरणांच्या परीसरातील फुटलेले कालवे त्वरीत दुरुस्त करावेत म्हणजे त्यातून होणारी पाण्याची मोठी गळती बंद करता येऊन पाणी वाया जाणार नाही.
> कारखान्यांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा ह्या करीता प्रक्रीया पध्दतीत आधुनिकीकरण व्हावे.
> पाण्याचा पुनर्वापर करावा ह्या करीता सर्वानी गांभिर्याने विचार करून अंमलबजावणी करावी.
> पाण्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाला पाण्याचा कार्यक्षम पणे वापर करण्याकरीता शासनाने प्रचार मोहीम राबवुन प्रबोधन करावे. शिस्तभंगा करीता दंडाची तरतूद करावी.
> मोठ-मोठ्या शहरांना खरोखर दररोज २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहेका? ह्यावर विचार करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात त्यांना पाणी कसे व किती दिवसांनी मिळते ह्यावरही विचार करावा.
> सर्व शहरे, तालुके, ग्रामिण भागातही रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे व्हावे.
> उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा हिशोब, ताळेबंद ठेवावा, मागणी प्रमाणे वॉटरमिटरने पाणी मोजुन द्यावे व त्यानुसार बिलाची आकारणी झाल्यास आपोआप सर्वांकडे पाण्याचा काळजीपुर्वक वापर होईल.
पाणी टंचाईचे संकट आपण कधी गांभीर्याने घेणार आहोत?
ही समस्या वाढत जाणार आहे. पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमपणे वापर करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे हे समजून घेण्याची गरज आहे. स्वार्थी बनू नये. पाणी काटकसरीने वापर करण्याकरीता लोकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज आहे. चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यास शिक्षा किंवा दंड झाला तर समाजात इतर लोकांनाही चपराक बसेल.
पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा ही कळकळ आहे, तळमळ आहे. सर्वात जास्त पाण्याचा शेती व्यवसाय मध्ये होतो. शेतकरी बंधुंना माझी नम्र विनंती आहे की पाणी पिकांना द्या जमिनीला नाही. पिकांना गरजे एवढेच पाणी दिल्याने कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढणार आहे ह्या करीता ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
Reduce, Recycle n Reuse हाच सर्वात उत्तम पर्याय आहे. ह्याकरीता समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक घटकांचे पाण्याचा काटकसरीने, कार्यक्षम वापर होण्याकरीता प्रबोधन करण्याची गरज आहे. समाजमाध्यमे असो की प्रिंट मिडिया असो की इलेक्ट्रॉनिक मिडिया असो सर्वानी आपल्या परीने लोकांचे प्रबोधन केले पाहीजे.
बघा जमतंय का? आपल्या आणि पुढच्या पिढीचं भवितव्य आपल्या हाती आहे, उशीर होण्या आधीच जागं होण्याची गरज आहे. पाणी टंचाईवर उपाय करणे ही सामुहिक काम असुन आपली सामाजिक जबाबदारी आहे. शेवटी जल है तो कल है। पाणी हेच जीवन आहे. बघा जमतंय का? स्वत: पासुन सुरुवात करावी.
डॉ. बी डी जडे
वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ, जैन इरीगेशन सिस्टीम्स लि.