Krushi Salla : सध्या मराठवाड्यात हवामानात झपाट्याने बदल होत असून, आगामी काही दिवसांत जोरदार वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (krushi salla)
१६ ते २० मे दरम्यान लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत पोहोचू शकतो.
अशा बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकांची, फळबागांची तसेच काढणीला आलेल्या फळे व भाजीपाल्याची योग्य खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान तज्ज्ञांनी पिकांच्या संरक्षणासाठी कृषी सल्ला जारी केला असून त्यानुसार योग्य व्यवस्थापन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तज्ज्ञांनी १६ ते २० मे २०२५ दरम्यान मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
यासोबतच कमाल व किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पीक काढणी आणि साठवणुकीबाबत तातडीची काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात १८ मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, जालना येथे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १९ मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, परभणी तर २० मे रोजी धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी येथे पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या दिवसांत वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. राहण्याची शक्यता असून हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
येत्या चार दिवसांत तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर कमाल व किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिसअने घट होण्याची शक्यता आहे.
बाष्पोत्सर्जन वेग वाढला
इसरो-अहमदाबादच्या उपग्रह आकडेवारीनुसार, मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे.
शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या पिकांची त्वरित काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हवामानाच्या बदलत्या परिस्थितीत पुढील पिकांसाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. खाली दिलेला सल्ला या अनुषंगाने महत्त्वाचा आहे.
संदेश : मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक व बागायती व्यवस्थापनात योग्य ती काळजी घ्यावी. हवामान अनुकूल नसल्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य नियोजन व सल्ल्यानुसार कार्यवाही करावी.
* ऊस पिकावर तण नियंत्रण व कीड व्यवस्थापनासाठी वेळोवेळी फवारणी करावी
* हळदीची काढणी व साठवणूक वेळेत करावी
* उन्हाळी तीळ पिकाला नियोजित सिंचन द्यावे
फळबाग व्यवस्थापन
* संत्रा/मोसंबी बागेत फळगळ टाळण्यासाठी पोषकद्रव्य फवारणी करावी
* आंबा व केळी फळांची तात्काळ काढणी करावी.
* झाडांना सावली व आच्छादन द्यावे.
भाजीपाला व फुलशेती
* काढणीस तयार भाजीपाला व फुलांची त्वरित काढणी
* रसशोषक किडीचे नियंत्रण
तुती-रेशीम उद्योग
* पाण्याचे नियोजन ठिबकद्वारे करावे
* उन्हाळ्यात संगोपन टाळण्याचा विचार करावा
(सौजन्य: मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)