पुणे : मागील महिनाभरापासून राजस्थानातून दाखल होत असलेल्या संत्र्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्याची आवक घटली आहे.
परिणामी दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांसाठी राजस्थानची संत्री आंबट ठरत आहे. महिनाभरापूर्वी राजस्थानच्या संत्र्याची मार्केट यार्डातील फळबाजारात आवक होत आहे.
मात्र राजस्थानातील हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आवक घटली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे.
घाऊक बाजारात प्रतिकिलोला ६० ते १०० रुपये दर मिळत आहे. बाजारात रोज सुमारे दोन ट्रकची आवक होत आहे. येत्या काळातही तुरळक आवक सुरूच राहणार असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
हंगाम बहरात असताना बाजारात रोज २ ते २.५ हजार क्रेटची आवक होत होती. एका क्रेटमध्ये १८ किलो संत्रा होता. मागील वर्षी बाजारात एकाच वेळी नागपूर आणि राजस्थानी संत्राची आवक सुरू होती. त्यामुळे आवक चांगली होती.
दरही ग्राहकांच्या आवाक्यात होते. यंदा नागपूरच्या संत्राची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात राजस्थान येथून आलेल्या संत्राची अधिक आवक होती.
गेल्या वर्षी या संत्राला प्रतिकिलोला ४० ते ७० रुपये दर मिळाला होता. तसेच पोषक वातावरणामुळे आवक अधिक असल्याने हंगामही जास्त काळ चालला होता.
नागपूर संत्र्याची पन्नास टक्केच आवक
◼️ अधिकच्या पावसाचा नागपूर संत्र्याला मोठा फटका बसला.
◼️ मोठ्या प्रमाणात झाडांवरची फळे गळून पडल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली.
◼️ त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात ५० टक्केच संत्र्याची आवक झाली.
◼️ त्यामुळे दर अधिक होते. नागपूर संत्राचा हंगाम १५ दिवसांपूर्वीच संपला आहे.
अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?
